नवी दिल्ली - भाजपा नेते अमित मालवीय (BJP Amit Malviya) यांनी राहुल गांधींचा (Congress Rahul Gandhi) एक व्हिडीओ शेअर करत जोरदार हल्लाबोल केला आहे. तेलंगणात शेतकरी रॅली सुरू होण्याआधीचा हा व्हिडीओ आहे. यामध्ये राहुल गांधीकाँग्रेस नेत्यांसोबत चर्चा करताना दिसत आहेत. मात्र, यादरम्यान आजचा विषय काय? मला नेमकं काय बोलायचं आहे? असा प्रश्न राहुल सहकाऱ्यांना विचारताना दिसत आहेत. सोशल मीडियावर हा व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. भाजपा नेते अमित मालवीय यांनी आपल्या ट्विटर अकांऊटवरून याबाबत एक ट्विट करत व्हिडीओ शेअर केला आहे.
"जेव्हा तुम्ही वैयक्तिक परदेशी सहली आणि नाईट क्लबिंगच्यामध्ये राजकारण करता तेव्हा असं होतं" असा सणसणीत टोला देखील अमित मालवीय यांनी राहुल गांधींना लगावला आहे. राहुल गांधी दोन दिवसीय दौऱ्यासाठी तेलंगणा येथे आले आहेत. त्यावेळी ते एका खोलीत काँग्रेसच्या काही नेत्यांसोबत बसले होते. राज्यातील शेतकऱ्यांना संबोधित करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाआधीचा हा व्हिडीओ असल्याचा दावा केला जात आहे. यामध्ये राहुल इतर कार्यकर्त्यांना मला नेमकं काय बोलायचं आहे हे विचारत आहेत.
17 सेकंदाच्या या व्हि़डीओ क्लीपमध्ये राहुल गांधी हे खुर्चीवर बसले असून इतरांना आजचा मुख्य विषय काय आहे, मला नेमकं काय बोलायचं आहे ते विचारत आहेत. यावरूनच भाजपाने त्यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. राहुल गांधी हे कोरोना व्हायरसमुळे झालेल्या मृत्यूंवर राजकारण करत आहेत, असा आरोप भारतीय जनता पक्षाने केला आहे. यासंदर्भात बोलताना, जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) जाहीर केलेला ‘डेटा’ आणि काँग्रेसचा ‘बेटा’ दोन्ही चुकीचे असल्याचे भाजपने म्हटले आहे.
पक्षाच्या कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत भाजप प्रवक्ते संबित पात्रा म्हणाले, भारतात कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंसंदर्भात डब्ल्यूएचओने जाहीर केलेली आकडेवारी चुकीची आहे. भारत सरकारने याबाबत डब्ल्यूएचओकडे आक्षेपही नोंदवला आहे. एवढेच नाही, तर डब्ल्यूएचओने जारी केलेल्या आकडेवारीवरून संपूर्ण जगात भारतासंदर्भात भ्रामक स्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे, असेही ते म्हणाले. पात्रा म्हणाले, राहुल गांधी सातत्याने भारताचा कमीपणा दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर टीका करत वारंवार भारताचा कमीपणा दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. मृत्यू आणि जन्मासंदर्भातील आंकडेवारीची नोंद ठेवण्यासाठी भारताकडे एक चांगल्या प्रकारची प्रणाली आहे.