रायबरेली लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी दणदणीत विजय मिळवला. या विजयानंतर राहुल गांधी आभार सभेला संबोधित करण्यासाठी मंगळवारी रायबरेली येथे पोहोचले. यावेळी राहुल यांनी अयोध्येतील भाजपाच्या पराभवाचाही उल्लेख केला. राहुल गांधी म्हणाले की, अयोध्येत पराभव झाला. अयोध्येत राम मंदिर बांधलं. त्याच्या उद्घाटनाच्या वेळी तुम्हाला गरीब माणूस दिसला नाही. त्यामुळे अयोध्येतील जनतेने त्यांना उत्तर दिलं आहे.
"अयोध्येत राम मंदिर बांधलं. एकाही गरीब व्यक्तिला निमंत्रित केलं नाही. उद्घाटनाला एकही शेतकरी, एक मजूर, एक मागासलेला व्यक्ती, एक दलित व्यक्ती दिसला नाही. आदिवासी राष्ट्रपतींना सांगण्यात आलं की तुम्ही यासाठी येऊ शकत नाही. तुम्ही पाहिलं असेल या सोहळ्यासाठी अदानी, अंबानी उभे होते, उद्योगपती उभे होते, संपूर्ण बॉलिवूड उभं होतं, क्रिकेटची टीम उभी होती, पण एकही गरीब नव्हता, याचंच उत्तर आता अयोध्येतील जनतेने दिलं आहे" असं म्हणत राहुल गांधींनी निशाणा साधला आहे.
"प्रियंका गांधी वाराणसीतून लढल्या असत्या तर मोदी हरले असते"
प्रियंका गांधींनी वाराणसीतून निवडणूक लढवली असती तर पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन-तीन लाख मतांनी पराभूत झाले असते, असा दावा राहुल यांनी केला. "या निवडणुकीत भारताने संदेश दिला आहे की नरेंद्र मोदीजींचे 'व्हिजन' आम्हाला आवडत नाही. आम्हाला द्वेष नको आहे, हिंसा नको आहे. आम्हाला प्रेमाचं दुकान (मोहब्बत की दुकान) हवं आहे."
"देशासाठी नव्या 'व्हिजन'ची गरज आहे. देशाला नवी 'व्हिजन' द्यायची असेल, तर ती उत्तर प्रदेशातूनच द्यावी लागेल आणि राज्यात आणि देशात आम्हाला इंडिया आघाडी, समाजवादी पक्ष आणि काँग्रेस हवी आहे असा संदेश उत्तर प्रदेशने दिला आहे" असं देखील राहुल गांधींनी म्हटलं आहे.
"अयोध्येतील जनतेने उत्तर दिलं आहे"
अयोध्येतील भाजपाच्या पराभवाचा संदर्भ देत राहुल म्हणाले की, "अयोध्येतील जनतेने उत्तर दिलं आहे. केवळ अयोध्येतच नाही तर वाराणसीतही असंच आहे. मी माझ्या बहिणीला (प्रियंका गांधी) सांगतोय की, तिने वाराणसीतून निवडणूक लढवली असती तर आज पंतप्रधान दोन-तीन लाख मतांनी वाराणसीची निवडणूक हरले असते."
"देशात दहा वर्षे बेरोजगारी, द्वेष आणि हिंसा पसरवली"
"मी हे उद्दामपणाने बोलत नाही, तर जनतेने पंतप्रधान मोदींना संदेश दिला आहे की आम्हाला त्यांचं राजकारण आता आवडत नाही. आम्हाला प्रगती हवी आहे. तुम्ही या देशात दहा वर्षे बेरोजगारी, द्वेष आणि हिंसा पसरवली. जनतेने पंतप्रधानांना चांगलंच उत्तर दिलं आहे."