काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मणिपूरमधून 'भारत जोडो न्याय यात्रा' सुरू केली आहे. या यात्रेच्या माध्यमातून बेरोजगारी, महागाई आणि सामाजिक न्यायाशी संबंधित मुद्दे लोकसभा निवडणुकीत चर्चेच्या केंद्रस्थानी आणावेत, अशी काँग्रेसची इच्छा आहे. ही यात्रा 67 दिवसांत जवळपास 110 जिल्ह्यांतून 6,700 किलोमीटरहून अधिक अंतर प्रवास करणार आहे.
यात्रा सुरू करण्यापूर्वी राहुल गांधींनी इम्फाळच्या बोथलमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर जोरदार हल्लाबोल केला. "मी 2004 पासून राजकारणात आहे, मी पहिल्यांदा भारतातील अशा राज्यात गेलो होतो जिथे शासन व्यवस्था कोलमडली होती, ज्याला आपण मणिपूर म्हणत होतो ते आता मणिपूर राहिलेले नाही... पण पंतप्रधान तुमचे अश्रू पुसण्यासाठी आले आहेत. तुम्हाला आपुलकीने जवळ घ्यायला आले नाहीत. कदाचित भाजपा आणि आरएसएससाठी मणिपूर हा देशाचा भाग नाही" असं म्हणत राहुल गांधींनी निशाणा साधला आहे.
"तुम्ही ज्याला महत्त्व दिलं ते गमावलं आहे. पण आम्ही तुम्ही ज्याला महत्त्व दिलं ते पुन्हा शोधू आणि तुमच्याकडे परत आणू. मणिपूरच्या लोकांच्या वेदना आम्हाला समजतात. आपण ज्या जखमा, नुकसान आणि दु:ख सहन केलं ते आम्हाला समजतं. आम्ही तुम्हाला वचन देतो की तुम्ही ज्याला महत्त्व दिलं आहे ते आम्ही परत आणू, आम्ही सद्भाव, शांतता, स्नेह परत आणू, ज्यासाठी हे राज्य नेहमीच ओळखलं जातं."
"आम्ही भारत जोडो यात्रा सकाळी 6 वाजता सुरू करायचो आणि संध्याकाळी 7 वाजेपर्यंत चालायचो, शेवटी आमचं संध्याकाळी 20-25 मिनिटं भाषण व्हायचं पण आम्ही तुमचं म्हणणं 7-8 तास ऐकायचो. आमच्या मनात काय आहे ते आम्हाला सांगायचे नाही, आम्हाला तुमचं ऐकायचं आहे, तुमचं दुःख समजून घ्यायचं आहे. देशवासीयांवर मोठा अन्याय होत असल्याने 'भारत जोडो न्याय यात्रा' काढण्यात येत आहे" असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.
"सद्भावना, समानता आणि बंधुता यांनी परिपूर्ण भविष्याचं दर्शन घडविण्याचं पक्षाचं उद्दिष्ट आहे. प्रवास कुठून सुरू करायचा, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता? हा प्रवास मणिपूरपासूनच सुरू झाला पाहिजे, असं मी स्पष्टपणे सांगितलं होतं. मणिपूरमध्ये जे घडलं ते भाजपा आणि आरएसएसच्या द्वेषाच्या राजकारणाचं प्रतीक आहे" असा दावा राहुल गांधी यांनी केला आहे.