लोकसभा निवडणुकीपूर्वी तिसऱ्या आघाडीच्या चर्चांना उधाण आलं आहे. दरम्यान, तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वावरून जोरदार टीका केली आणि भाजपवरही हल्लाबोल केला. “भाजपला राहुल गांधींना नेता बनवायचं आहे, म्हणूनच संसद चालू देत नाही. जर राहुल गांधी विरोधकांचा चेहरा असतील तर मोदींना कोणीही वाईट म्हणू शकणार नाही. राहुल गांधी हे स्वतः मोदींचे मोठे... फार काही बोलणार नाही, पण तुम्ही समजू शकता,” असं म्हणत त्यांनी टीकेचा बाण सोडला.
ममता बॅनर्जी यांनी रविवारी मुर्शिदाबाद जिल्ह्यात टीएमसी कार्यकर्त्यांना फोनवरून संबोधित केलं. राहुल गांधींचं नाव घेत ममता बॅनर्जी यांनी भाजपवरही निशाणा साधला. “भाजपला संसद चालवायची नाही. कारण त्यांना राहुल गांधींना नेता बनवायचं आहे. राहुल गांधीच नेते राहिले तर नरेंद्र मोदींना कोणी वाईट म्हणणार नाही. नरेंद्र मोदींचा सर्वात मोठा टीआरपी राहुल गांधी आहेत. नाहीतर, परदेशात कोणी काही बोलले, इथे गदारोळ होतो असं कधी पाहिलंय का?” असा सवाल त्यांनी केला आहे.
“संसदेतील कामकाज सुरू राहावं आणि अदानी प्रकरणावर चर्चा व्हावी, अशी आमची इच्छा आहे. एलआयसीवर चर्चा व्हायला हवी. अदानींबाबत चर्चा का होत नाही. एलआयसीवर चर्चा का होत नाही. गॅसच्या किमतीबाबत चर्चा का केल्या जात नाहीत. याचदरम्यान, युनिफॉर्म सिव्हिल कोड लागू कॉपी सादर करण्यात आली आहे. आम्ही ते नाही मानत. त्याची अंमलबजावणी आम्ही होऊ देणार नाही,” असंही ममता बॅनर्जी यांनी स्पष्ट केलं.
“विरोधकांचा बिग बॉस समजू नये”दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या भेटीनंतर टीएमसीनं काँग्रेसवर हल्लाबोल केला होता. तृणमूल काँग्रेसचे खासदार सुदीप बॅनर्जी म्हणाले की, काँग्रेसनं विरोधकांचा बिग बॉस आहे असं समजू नये. “बैठकीत प्रादेशिक पक्षांना भाजपविरोधात एकत्र आणण्याबाबत आणि काँग्रेसपासून समान अंतर ठेवण्याबाबत चर्चा झाली. राष्ट्रीय आणि राज्य स्तरावर टीएमसी पूर्ण ताकदीनं पुढे जाईल. काँग्रेस काय करत आहे हे कळत नाही, पण बंगालमध्ये काँग्रेस, भाजप आणि सीपीएम एकत्र आहेत आणि ममता सरकारला समस्या निर्माण करत आहेत. एकत्र येण्यासाठी राज्यातील विरोधी पक्षांशी चर्चा करू,” असंही ते म्हणाले होते.