काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी राम मंदिराच्या उद्घाटनाबाबत आपली भूमिका आता स्पष्ट केली आहे. राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याला जाणार नसल्याचं म्हटलं आहे. यामागचं कारण स्पष्ट करताना राहुल गांधी म्हणाले की, "22 जानेवारीचा कार्यक्रम हा राजकीय कार्यक्रम आहे. आम्ही सर्व धर्मांसोबत आहोत. मला धर्माचा फायदा घ्यायचा नाही. मला त्यात रस नाही. मात्र, ज्याला तिथे जायचे असेल तो जाऊ शकतो. पण आम्ही त्यादिवशी तिथे जाणार नाही."
"आमच्या पक्षातील कोणीही तिथे जाऊ शकतं. मात्र आम्ही राजकीय कार्यक्रमांना जाणार नाही. मला वाटतं की, जो खऱ्या अर्थाने धर्मावर विश्वास ठेवतो त्याचं त्याच्याशी वैयक्तिक नातं असतं. मी माझं जीवन धर्माच्या तत्त्वांनुसार जगण्याचा प्रयत्न करतो. मी लोकांशी योग्य वागतो आणि त्यांचा आदर करतो. मी द्वेष पसरवत नाही."
आरएसएस आणि भाजपाने 22 जानेवारीच्या कार्यक्रमाला नरेंद्र मोदींचा राजकीय कार्यक्रम बनवला आहे. हा संघ आणि भाजपाचा कार्यक्रम झाला आहे. त्यामुळे राहुल गांधी यांनी कार्यक्रमाला जाणार नसल्याचं सांगितलं आहे. सर्व धर्मांना मानणारे आणि त्यांचा आदर करणार्यांपैकी आम्ही आहोत. हिंदू धर्मातील मोठ्या नेत्यांनीही आपलं मत मांडलं आहे. त्यांनी याला राजकीय कार्यक्रम असंही म्हटलं आहे.
नागालँडमधील कोहिमा शहरात पत्रकार परिषदेत बोलताना राहुल गांधी यांनी या सर्व गोष्टी सांगितल्या. राहुल सध्या भारत जोडो न्याय यात्रा काढत आहेत. मणिपूरपासून सुरू झालेला राहुल गांधींचा हा प्रवास सध्या नागालँडमध्ये आहे.
राहुल गांधींच्या वक्तव्यावर भाजपाने देखील प्रतिक्रिया दिली आहे. केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेते राजीव चंद्रशेखर यांनी राहुल गांधींचे गुरू सॅम पित्रोदा यांचं विधान काही दिवसांपूर्वीच आलं होतं असं म्हटलं आहे. तसेच कोट्यवधी भारतीयांना राम मंदिराचा मुद्दा जवळचा वाटतो. आता राहुल गांधी जे काही बोलत आहेत त्याचा जनतेच्या भावनांवर काहीही परिणाम होणार नाही असंही म्हटलं आहे.