Rahul Gandhi Call Nitish Kumar ( Marathi News ): विरोधकांच्या इंडिया आघाडीची बैठक दिल्लीत झाली. या बैठकीत अनेक कारणांवरून आघाडीत सामील पक्षांमध्ये नाराजी नाट्य घडल्याचे दिसले. हिंदी भाषा, पंतप्रधानपदाचा चेहरा यावरून आघाडीत एकमत नसल्याचे दिसून आले. या बैठकीनंतर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार नाराज असल्याची चर्चा होती. नाराज नितीश कुमारांची मनधरणी करण्यासाठी काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी फोन केल्याचे सांगितले जात आहे.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार करावे, असा प्रस्ताव ठेवला. याला दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी समर्थन दिले. मात्र, नितीश कुमार यांना हा प्रस्ताव पटला नाही. तसेच हिंदी भाषेवरूनही इंडिया आघाडीच्या बैठकीत वातावरण तापले. यावरून नितीश कुमार नाराज असल्याचे बोलले जात होते.
नाराज नितीश कुमारांना राहुल गांधींचा फोन
मीडिया रिपोर्टनुसार, राहुल गांधी यांनी नितीश कुमार यांना फोन केला. या दोन्ही नेत्यांमध्ये नेमके काय बोलणे झाले याबाबत कुणी काही सांगायला तयार नाही. परंतु, इंडिया आघाडीच्या बैठकीतील घटनाक्रमावर या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचा कयास बांधला जात आहे. जेडीयूच्या मते इंडिया आघाडीने पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल, याबाबत कोणत्याही नेत्याचे नाव जाहीर करू नये. आधी एकत्रित लोकसभा निवडणुकांना सामोरे जावे. इंडिया आघाडीच्या बैठकीत नितीश कुमार त्रस्त दिसत होते, असेही म्हटले जात आहे.
दरम्यान, ममता बॅनर्जी आणि अरविंद केजरीवाल यांच्याशिवाय अन्य कोणत्याही पक्षाकडून वा नेत्याने पंतप्रधानपदाचे उमेदवार मल्लिकार्जुन खरगे यांच्या नावाच्या दिलेल्या प्रस्तावावर प्रतिक्रिया दिली नाही. मल्लिकार्जुन खरगे यांनी स्वतः या प्रस्तावाला बगल दिली. तसेच लोकसभा निवडणुकांत जास्तीत जास्त जागा जिंकण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, यावर भर द्यायला हवा, असे स्पष्ट केले.