Rahul Gandhi News: आगामी लोकसभा तसेच पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशभरात राजकीय वातावरण तापल्याचे पाहायला मिळत आहे. भाजप सातत्याने काँग्रेससह विरोधकांवर घराणेशाहीचा आरोप करत टीका करत असते. घराणेशाहीच्या मुद्द्यावरून काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी भाजपच्या तीन नेत्यांनी थेट नावे घेतली असून, संताप व्यक्त करत टीका केली आहे.
काँग्रेस घराणेशाहीचे राजकारण करत असल्याचा आरोप भाजपने केला आहे. यावर, राहुल गांधींना प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना राहुल यांनी, अमित शाह यांचा मुलगा काय करतो? राजनाथ सिंह यांचा मुलगा काय करतो? असा प्रतिप्रश्न केला.
भाजपने आधी आपले नेते आणि त्यांची मुले काय करतात हे पाहावे
माझ्या माहितीप्रमाणे अमित शाह यांचा मुलगा भारतीय क्रिकेट चालवतो. भाजपने आधी आपले नेते आणि त्यांची मुले काय करतात हे पाहावे. अनुराग ठाकूर यांच्याशिवाय घराणेशाहीच्या राजकारणाची उदाहरणे असणारे आणखी काही लोक आहेत, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. दुसरीकडे, इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धावर प्रतिक्रिया देताना राहुल गांधी म्हणाले की, काँग्रेस सर्व प्रकारच्या हिंसाचाराच्या विरोधात आहे. निष्पाप नागरिकांवरील कोणत्याही प्रकारच्या हिंसाचाराचे समर्थन करत नाही. आम्ही सर्व प्रकारच्या हिंसाचाराचा विरोध करतो, असे राहुल गांधी यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, हिंसाचार माफ करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. जो कोणी लोकांना मारतो तो चुकीचा आहे. नागरिकांची हत्या करणे हा गुन्हा आहे. निष्पाप नागरिकांची हत्या कुठेही झाली तरी आमचा विरोध आहे, असेही राहुल गांधी यांनी म्हटले आहे.