Rahul Gandhi News: राम मंदिराचे एवढे लोकार्पण करण्यात आले. परंतु, त्या लोकार्पणाच्या कार्यक्रमात केवळ अब्जाधीश, बॉलिवूडचे कलाकार आणि क्रिकेटर दिसले. या सोहळ्यात गरीब सामान्य आणि शेतकरी कुठे दिसले का, अशी विचारणा काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी केली. ग्वालियर-चंबल अंचल येथील एका प्रचारसभेत बोलताना राहुल गांधी यांनी भाजपा आणि केंद्र सरकारवर टीका केली.
ही विचारधारेची लढाई आहे. काँग्रेस पक्ष संविधान वाचवण्याचे प्रयत्न करत आहे. संविधानामुळे गरिबांना हक्क मिळाले आहेत. नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान झाले, तर संविधान बदलणार आहेत. हीच आता देशात मुख्य लढाई सुरू आहे. केवळ २० ते २५ अब्जाधीशांकडून देश चालवला जावा, हीच भाजपाची इच्छा आहे. तुम्ही जर आरक्षणाला विरोध करत नाही, मग सरकारी क्षेत्राचे खासगीकरण का करत आहात, असा सवाल राहुल गांधी यांनी केला. तसेच अग्निवीर योजनेवरून राहुल गांधी यांनी भाजपावर निशाणा साधला.
गरिबांची यादी बनवून एक लाख रुपये खात्यात जमा करणार
पंतप्रधान मोदी प्रचारात व्यस्त आहेत आणि २४ तास त्यांनाच दाखवले जात आहे. नरेंद्र मोदी केवळ २० ते २५ जणांना अब्जाधीश करू शकतात. मात्र, काँग्रेस पक्ष कोट्यवधी लोकांना लखपती करू शकतो. आम्ही गरिबांची एक यादी तयार करणार आहोत. एका महिलेचे नाव निवडले जाईल आणि त्या महिलेच्या खात्यात एका वर्षात एक लाख रुपये जमा केले जातील, असे आश्वासन राहुल गांधी यांनी दिले.
दरम्यान, देशातील बेरोजगार युवकांना प्रशिक्षणाची संधी मिळत नाही. इंडिया आघाडीचे सरकार सर्व पदवीधारक आणि डिप्लोमा केलेल्यांना नोकरीची गॅरंटी देणार आहे. चांगल्या कंपनीत प्रशिक्षणाची संधी दिली जाईल. तसेच तुमच्या खात्यात एक लाख रुपये जमा केले जातील, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. तसेच नरेंद्र मोदी यांनी भारतीय सैन्याचा अपमान केला आहे. भारतीय लष्कराला अग्निवीर योजना नको आहे. मात्र, नरेंद्र मोदी यांनी ही योजना सैन्यावर थोपली आहे, अशी टीका राहुल गांधी यांनी केली.