Rahul Gandhi Vs PM Narendra Modi: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष कंबर कसून तयारीला लागले आहेत. अनेक पक्षांनी उमेदवारी यादी जाहीर केली आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी तीव्र होताना पाहायला मिळत आहेत. काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा सुरू आहे. देशातील बेरोजगारीवरून राहुल गांधी यांनी एक्सवर एक पोस्ट करत केंद्र सरकारवर टीका केली.
देशातील तरुणांनो, एक गोष्ट लक्षात घ्या! नरेंद्र मोदींचा हेतू रोजगार देण्याचा नाही. नवीन पदे निर्माण करणे तर दूरच, केंद्र सरकारच्या रिक्त पदांवरही भरती केली जात नाही. केंद्र सरकारने संसदेत सादर केलेल्या आकडेवारीचा विचार केला तर ७८ विभागांमध्ये ९ लाख ६४ हजार पदे रिक्त आहेत. महत्त्वाच्या खात्यांवर नजर टाकली तर रेल्वेत २.९३ लाख, गृह मंत्रालयात १.४३ लाख आणि संरक्षण मंत्रालयात २.६४ लाख पदे रिक्त आहेत, असा दावा राहुल गांधी यांनी आपल्या पोस्टमध्ये केला आहे.
१५ प्रमुख विभागांमध्ये ३० टक्क्यांपेक्षा जास्त पदे का रिक्त आहेत याचे उत्तर केंद्र सरकारकडे आहे का? गॅरंटीचे खोटे दावे करणाऱ्या पंतप्रधानांच्याच कार्यालयात मोठ्या प्रमाणात अत्यंत महत्त्वाची पदे का रिक्त आहेत? कायमस्वरूपी नोकऱ्या देणे हे ओझे समजणारे भाजपा सरकार सातत्याने कंत्राटी पद्धतीला प्रोत्साहन देत आहे, जिथे ना सुरक्षा, ना सन्मान, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.
रिक्त पदे हा देशातील तरुणांचा हक्क असून, भरती प्रक्रियेसाठी आम्ही ठोस योजना तयार केली आहे. भारताचा संकल्प आहे की, आम्ही तरुणांसाठी नोकऱ्यांचे बंद दरवाजे उघडू. बेरोजगारीचा काळा काळ दूर होऊन तरुणांच्या भाग्याचा सूर्योदय होणार आहे, असा विश्वास राहुल गांधी यांनी व्यक्त केला.