Rahul Gandhi On NEET-NET Exam: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशिया-युक्रेन युद्ध, इस्रायल-गाजातील संघर्ष रोखले असे सांगितले जाते. परंतु, देशातील नीट आणि नेट परीक्षेतील पेपरफुटी पंतप्रधान मोदी थांबवू शकले नाहीत, अशी टीका काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी केली आहे. नीट परीक्षेतील मोठा घोळ समोर आल्यानंतर १८ जून रोजी घेण्यात आलेली नेट परीक्षाही रद्द करण्यात आली. यावरून विरोधकांनी केंद्र सरकारला चांगलेच धारेवर धरले असून, राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेला संबोधित करताना नीट आणि नेट परीक्षेवरून हल्लाबोल केला.
सर्व शिक्षण संस्था RSS आणि भाजपाच्या लोकांनी ताब्यात घेतल्या आहेत. या शिक्षण संस्था आरएसएस आणि भाजपामुक्त होत नाहीत, तोपर्यंत हे असे प्रकार सुरूच राहणार. पंतप्रधान मोदी नीट आणि नेट परीक्षेतील घोळ थांबवू शकले नाहीत. या सर्व गैरप्रकाराला जबाबदार कोण आहे. यासाठी जबाबदार असलेल्यांना पकडले गेले पाहिजे, अशी मागणी राहुल गांधी यांनी यावेळी बोलताना केली. या सर्व प्रकाराची चौकशी व्हायलाच हवी, हे आम्ही सुरुवातीपासून सांगत आहोत. ज्यांनी पेपर लीक केला, त्यांच्यावर कठोर कारवाई करायला हवी. आगामी लोकसभा निवडणुकीत यासंदर्भात सरकारला जाब विचारणार असल्याचे राहुल गांधी यांनी सांगितले.
पंतप्रधान निर्णय घेण्यास सक्षम नाहीत
या पेपरफुटीचे केंद्र मध्य प्रदेश, गुजरात आणि उत्तर प्रदेश आहे. सरकारबाबत विश्वासार्हता राहिलेली नाही. शिक्षण व्यवस्थेवर एकाच संघटनेने ताबा घेतला आहे. यातील पदांवर त्यांचेच लोक नियुक्त करण्यात आले आहेत. पंतप्रधान कोणताही निर्णय घेण्यास सक्षम नाही. त्यांचे सगळे लक्ष आता लोकसभा अध्यक्षांच्या निवडणुकीवर आहे. त्यांना सरकार आणि अध्यक्षपदाची चिंता आहे. पंतप्रधान मानसिकदृष्ट्या खचलेले आहेत. हे सरकार चालवण्यासाठी त्यांना संघर्ष करावा लागत आहेत, असा दावाही राहुल गांधी यांनी केला.
दरम्यान, पंतप्रधान जनतेत भीती निर्माण करून सरकार चालवत आहेत. मात्र, जनता आता घाबरत नाही. वाजपेयी किंवा मनमोहन सिंग असते, तर काहीतरी होऊ शकले असते. विनम्रता, सन्मान आणि प्रश्न सोडवण्याची क्षमता त्यांच्यात होती. मात्र, नरेंद्र मोदी या सर्व गोष्टींवर विश्वास ठेवत नाहीत, या शब्दांत राहुल गांधी यांनी टीकास्त्र सोडले.