नवी दिल्ली :केंद्र सरकारनेपेट्रोल आणि डिझेलच्या उत्पादन शुल्कात कपात केल्यानंतर काँग्रेसने भाजपावर टीका करीत म्हटले आहे की, हा तर भ्रम निर्माण करण्याचा प्रकार आहे.
काँग्रेसच्या मुख्यालयात पत्रकारांशी बोलताना प्रवक्ते गौरव वल्लभ यांनी मोदी सरकारवर टीका करताना म्हटले आहे की, हे सरकार राजकीय नाट्यात पुढे आणि दिलासा देण्यात मागे आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ट्वीट करीत अनेक घोषणा केल्या. मात्र, यातून भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचेही ते म्हणाले. उत्पादन शुल्कात जरी कपात केली असली तरी यातून काही फरक पडणार नाही. २०१४ मध्ये उत्पादन शुल्क ९.४८ रुपये होते आणि २०२२ मध्ये ते १९.९० रुपये आहे. तीन पावले पुढे टाकून दोन पावले मागे हटणे याचा अर्थ असा नाही की, सामान्य लोकांच्या जीवनात फरक पडला आहे. २०१४ मध्ये डिझेलवर प्रतिलिटर उत्पादन शुल्क ३.५६ रुपये होते. मे २०२२ मध्ये ते १५.८० रुपये झाले.
आकडे बोलतात...: काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी ट्वीट करीत १ मे २०२० आणि आजच्या पेट्रोल दराची तुलना केली आहे आणि म्हटले आहे की, केंद्र सरकारने लोकांना मूर्ख बनविणे बंद करावे. त्यांनी म्हटले आहे की, पेट्रोलचे दर १ मे २०२० : ६९.५० रुपये, १ मार्च २०२२ : ९५.४ रुपये, १ मे २०२२ :१०५.४० रुपये, २२ मे २०२२ : ९६.७० रुपये. आता पुन्हा पेट्रोलच्या दरात रोज ०.८ आणि ०.३ रुपये वाढ होण्याची शक्यता आहे. विक्रमी महागाईपासून लोकांना दिलासा हवा आहे आणि तो त्यांचा हक्क आहे.