Rahul Gandhi Controversy: काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याभोवती सुरू असलेल्या विविध वादांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने आपल्या सर्व सोशल मीडिया अकाउंटवरील प्रोफाइल फोटो बदलला आहे. या प्रोफाइल फोटोमध्ये राहुल गांधींचा फोटो लावण्यात आला असून, त्यावर "डरो मत" असे लिहिण्यात आले आहे. हा फोटो ट्विटर, फेसबूक अशा सर्व सोशल मीडिया अकाउंट्सवर टाकण्यात आला आहे.
गेल्या काही दिवसांपासून राहुल गांधी वादात अडकले आहेत. आधी लंडनमध्ये भारतीय लोकशाही आणि संसदेवर केलेल्या वक्तवाचा वाद आणि नंतर मोदी आडनावावर केलेल्या खोचक टीकेचा वाद. लंडनमधील वक्तव्यावरुन भाजपने राहुल गांदींच्या माफीची मागणी केली आहे. तसेच, मोदी आडनावावर केलेल्या वक्तव्यामुळे सुरत सत्र न्यायालयाने त्यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे.
मोदी आडनावाचा वाद2019 च्या लोकसभा निवडणुकीवेळी राहुल गांधी यांनी केरळमध्ये भाषणादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला होता. यावेळी त्यांनी 'मोदी' आडनाव असलेल्या फरारांवर ताशेरे ओढत 'सर्व चोरांचे आडनाव मोदीच का?' असा प्रश्न विचारला होता. यानंतर भाजप आमदार पुर्निश मोदी यांनी राहुल गांधींवर मानहानीचा खटला दाखल केला. सत्र न्यायालयाने त्या खटल्यात त्यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. पण, नंतर तात्काळ जामीनही देण्यात आला.
केंब्रिजमधील भाषणभारत जोडो यात्रा संपल्यानंतर राहुल गांधी लंडनला गेले, तेथे त्यांनी केंब्रिज विद्यापीठात भाषण केले. राहुल यांनी भारतातील लोकशाही, आरएसएस आणि मोदी सरकारच्या कार्यपद्धतीवर भाष्य केले, ज्यामुळे देशात मोठा गोंधळ उडाला. राहुल यांनी विदेशात जाऊन देशाची बदनामी केल्याचा आरोप भाजप नेते आणि मंत्र्यांनी केला. विरोधकांना संसदेत बोलू दिले जात नाही, असेही राहुल यांनी आपल्या भाषणात म्हटले होते. त्यांच्या वक्तव्यावरून सभागृहाच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचल्याचा आरोप भाजपने केला आहे.
संसदेचे सदस्यत्व जाणार?प्रशासनाने सूरतच्या सत्र न्यायालयाच्या निर्णयाची प्रत लोकसभा सचिवालयात पाठविली आणि लोकसभा सभापतींनी ती प्रत स्वीकारी, तर राहुल गांधींचे लोकसभा सदस्यत्व संपू शकते. राहुल गांधी यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली असून, त्यानंतर त्यांना सहा वर्षांपर्यंत निवडणूक लढवण्यावर बंदी घातली जाऊ शखते. अशाप्रकारे राहुल गांधी एकूण आठ वर्षांसाठी कोणतीही निवडणूक लढवू शकणार नाहीत. आता या निर्णयाविरोधात राहुल गांधी वरच्या न्यायालयात दाद मागू शकतात.