नवी दिल्ली - मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी राहुल गांधी सोमवारी अंमलबजावणी संचालनालयासमोर (ईडी) हजर होणार आहेत. त्याआधी काँग्रेस कार्यकर्त्यांनी राहुल गांधी यांच्या समर्थनात जोरदार घोषणाबाजी केली आहे. दिल्ली पोलिसांनी या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे. नवी दिल्लीतील काँग्रेस कार्यालयाबाहेर पक्षाचे नेते आणि समर्थक मोठ्या संख्येने जमले आहेत. यावेळी राहुल यांच्या समर्थकांनी सत्यमेव जयते असे फलक हातात घेतलेले दिसले. यासोबतच त्यांनी वंदे मातरमच्या घोषणाही दिल्या.
‘नॅशनल हेराल्ड-असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड’ कराराशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात राहुल गांधी आज ईडीसमोर हजर होणार आहेत. काँग्रेसचे सर्व प्रमुख नेते आणि खासदार दिल्लीतील ईडीच्या मुख्यालयावर निषेध मोर्चा काढतील आणि सत्याग्रह करतील. राज्यातील काँग्रेस नेतेही सोमवारी तपास यंत्रणेच्या कार्यालयावर मोर्चा काढून सत्याग्रह करत आहेत. यावेळी सत्ताधारी सरकार रावणाची भूमिका बजावत असल्याचे काँग्रेस कार्यकर्त्याने सांगितले. आम्ही त्यांना सांगू इच्छितो की, राहुल गांधी आमचे राम आहेत आणि आम्ही त्यांचे भक्त आहोत. राहुल गांधी ईडी कार्यालयातून बाहेर पडेपर्यंत आम्ही आमचे आंदोलन सुरूच ठेवू असं म्हटलं आहे
"आम्ही झुकणार नाही आणि घाबरणार नाही"
काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांनी "आम्ही राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली ईडी कार्यालयापर्यंत शांततापूर्ण निषेध मोर्चा काढणार आहोत. आम्ही संविधानाचे रक्षक आहोत, आम्ही झुकणार नाही आणि घाबरणार नाही. प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात करून मोदी सरकार काँग्रेसमुळे हादरल्याचे सिद्ध झाले आहे" असं म्हटलं आहे.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी "आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात ईडीने राहुल गांधींना पाठवलेले समन्स निराधार आहे आणि असे दिसते की भाजपा नेते किंवा पक्षाची सत्ता असलेली राज्ये तपास संस्थेच्या अधिकारक्षेत्रात येत नाहीत. आगामी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विरोधी पक्षांमध्ये एकजूट निर्माण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले पाहिजेत" असं म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.