नवी दिल्ली - राजस्थानच्या उदयपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मोहम्मद पैगंबर यांच्याविरोधात वक्तव्य करणाऱ्या नुपूर शर्माला पाठिंबा दिल्यामुळे एका शिंप्याची दुकानात घुसून हत्या करण्यात आली आहे. मारेकऱ्यांनी शिंप्याचा गळा निर्घृणपणे चिरला. उदयपूरमधील मालदास स्ट्रीट परिसरात ही भीषण घटना घडली आहे. कन्हैयालाल असे मृत शिंप्याचे नाव आहे. शिंप्यावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले. मृत व्यक्तीच्या 8 वर्षीय मुलाने नुपूर शर्माच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर पोस्ट केल्याचं म्हटलं आहे. या घटनेचा निषेध केला जात आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनीही या हत्या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे.
"धर्माच्या नावावर सुरू असलेली क्रूरता खपवून घेतली जाणार नाही" असं म्हणत संताप व्यक्त केला आहे. तसेच गुन्हेगारास लवकरात लवकर शिक्षा मिळावी, असं ही ते म्हणाले. राहुल गांधी (Congress Rahul Gandhi) यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. "उदयपूरमध्ये जी निर्घृण हत्या झाली त्यामुळे मला धक्का बसला आहे. धर्माच्या नावावर सुरू असलेली क्रूरता खपवून घेतली जाणार नाही. दहशत पसरविणाऱ्यांना लवकरात लवकर शिक्षा झालीच पाहिजे. आपल्या सर्वांना सोबत येऊन द्वेषाचा पराभव करायचा आहे. सर्वांनी शांतता आणि बंधुभाव राखावा, असे माझे आवाहन आहे" असं म्हटलं आहे.
खबरदारीचा उपाय म्हणून राजस्थानमधील इंटरनेट बंद करण्यात आले आहे. कन्हैयालाल यांची तीन जणांनी त्यांच्या दुकानात घुसून गळा चिरून हत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी हत्येप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली. रफीक मोहम्मद, अब्दुल जब्बार अशी हल्लेखोरांची नावे आहेत. नागरिकांनी आणि कुटुंबीयांनी याचा निषेध व्यक्त केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मृत कन्हैयालालच्या आठ वर्षीय मुलाने मोबाईलवरून नुपूर शर्माच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर पोस्ट केली होती. यानंतर काही लोक संतापले आणि दोन आरोपींनी धारदार शस्त्राने त्याच्या वडिलांची निर्घृण हत्या केली. या घटनेनंतर हिंदू संघटनेत संताप पसरला आहे.
दोन मुस्लिम आरोपींनी तलवारीने गळा चिरून युवकाची हत्या केली. या प्रकरणी आरोपींनी व्हिडीओ जारी करून हत्येची जबाबदारीही स्वीकारली आहे. असे कृत्य पुन्हा होऊ नये म्हणून मारेकऱ्यांना फाशी द्यावी, असे लोकांचे म्हणणे आहे. तरुणाच्या हत्येच्या निषेधार्थ स्थानिकांनी या घटनेनंतर मालदास गली परिसरातील दुकाने बंद ठेवली आहेत. या प्रकरणी राज्य सरकारने धानमंडी पोलीस ठाण्याचे एएसआय भवरलाल यांना निलंबित केले आहे. तसेच मृताच्या कुटुंबीयांना ३१ लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याची घोषणा केली आहे. याचबरोब कुटुंबातील दोन सदस्यांना सरकारी नोकरी देण्याची घोषणा केली आहे