जम्मू-काश्मीरच्या डोडा जिल्ह्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्याबाबत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संपूर्ण देश एकजुटीने उभा आहे, पण आम्ही सरकारकडे कठोर कारवाई करण्याची मागणी करतो असं म्हटलं आहे. राहुल यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे.
"आज पुन्हा जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत आमचे जवान शहीद झाले. शहीदांना श्रद्धांजली अर्पण करून, मी कुटुंबांप्रती संवेदना व्यक्त करतो. एकामागून एक अशा भयंकर घटना अत्यंत दुःखद आणि चिंताजनक आहेत. भाजपाच्या चुकीच्या धोरणांचे परिणाम आमचे जवान आणि त्यांचे कुटुंबीय भोगत आहेत."
"वारंवार होणाऱ्या सुरक्षेतील त्रुटींची संपूर्ण जबाबदारी सरकारने स्वीकारून देशाच्या आणि जवानांच्या गुन्हेगारांवर कठोरात कठोर कारवाई करावी, ही प्रत्येक देशभक्त भारतीयाची मागणी आहे. या दु:खाच्या काळात संपूर्ण देश दहशतवादाविरोधात एकजुटीने उभा आहे" असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.
जम्मू आणि काश्मीरच्या डोडा जिल्ह्यात सशस्त्र दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत गंभीर जखमी झालेल्या अधिकाऱ्यासह लष्कराचे चार जवान मंगळवारी (16 जुलै 2024) शहीद झाले.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय रायफल्स आणि जम्मू-काश्मीर पोलिसांच्या विशेष ऑपरेशन ग्रुपच्या जवानांनी सोमवारी संध्याकाळी देसा वनक्षेत्रातील धारी गोटे उरबागी येथे शोध मोहीम सुरू केली, त्यानंतर चकमक सुरू झाली.