Congress MP Rahul Gandhi News: लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीने जोरदार कमबॅक करत आपली ताकद दाखवून दिली. ४०० पारचा नारा देणाऱ्या भाजपाला केवळ २४० जागांवर रोखले. तर एनडीएच्या पाठिंब्यावर मोदी सरकार कायम राहिले. यानंतर संसदेच्या अधिवेशनाला सुरुवात झाली असून, खासदारांना शपथ देण्यात आली. यानंतर इंडिया आघाडीच्या महत्त्वाच्या बैठकीत राहुल गांधी यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यावरही निर्णय घेण्यात आला. लोकसभा सभागृहाने त्याला मान्यता दिली. यानंतर राहुल गांधी यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रतिक्रिया व्यक्त करत, जनतेला आश्वस्त केले आहे.
एक्सवर एक व्हिडिओ शेअर करत राहुल गांधी यांनी विरोधी पक्षनेते झाल्यावर मत व्यक्त केले. या व्हिडिओत राहुल गांधी म्हणतात की, देशातील जनतेला, काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना, इंडिया आघाडीच्या सर्व नेत्यांना मनापासून धन्यवाद देतो. मला कुणीतरी विचारले की, माझ्यासाठी विरोधी पक्षनेते पदाचा अर्थ काय होतो? त्यावर मी सांगितले की, लोकसभेतील विरोधी पक्षनेता म्हणजे तुमचा आवाज आहे. तुमच्या मनात ज्या काही भावना आहेत, तुमचे प्रश्न आहेत, समस्या आहेत, त्या विरोधी पक्षनेते पदाच्या माध्यमातून लोकसभेत मांडेन. हिंदुस्थानचे गरीब लोक, दलित, आदिवासी, मागासवर्ग, अल्पसंख्यक, शेतकरी, कामगार असो मी तुमचा आहे, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.
तुमचा आवाज संसदेत उठवणार
पुढे बोलताना राहुल गांधी यांनी सांगितले की, संविधानामुळे तुमचे संरक्षण होते. जिथे जिथे सरकारने संविधानावर आक्रमण केले. संविधान वाकवण्याचा प्रयत्न केला, तिथे तिथे पूर्ण ताकदीने संविधानाचे आम्ही रक्षण करू. मी तुमचा आहे आणि तुमचा आवाज संसदेत उठवणार, अशी ग्वाही राहुल गांधी यांनी दिली.
दरम्यान, माझ्यावर विश्वास दाखवल्याबद्दल सर्वांचे आभार मानतो. विरोधी पक्षनेता हे केवळ एक पद नाही,तर तुमचा आवाज बनणे आणि तुमच्या हितासाठी आणि अधिकारांसाठी लढणे, अशी एक मोठी जबाबदारी आहे. आपले संविधान गरीब, वंचित, अल्पसंख्यक, शेतकरी, कामगार यांचे सर्वात मोठे शस्त्र आहे. त्यावर होणाऱ्या प्रत्येक हल्ल्याला पूर्ण ताकदीने उत्तर देऊन त्याचे रक्षण करू. मी तुमचाच आहे आणि फक्त तुमच्यासाठीच आहे, असे आश्वासन राहुल गांधी यांनी दिले.