'श्रीमंताच्या मुलाला निबंध अन् ट्रक चालकांना १० वर्षाची शिक्षा'; पुणे प्रकरणात राहुल गांधींचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2024 08:45 AM2024-05-22T08:45:18+5:302024-05-22T09:02:43+5:30
Pune Accident : पुणे पोर्श अपघात प्रकरणावरुन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सरकारला रोखठोक सवाल विचारला आहे.
Pune porsche accident : पुणे पोर्श अपघात प्रकरणावरुन आता देशपातळीवरुन भाष्य केलं जात आहे. पुण्याच्या कल्याणीनगर भागात मद्यप्राशन करून अल्पवयीन मुलाने भरधाव वेगात कार चालवून धडक दिल्याने दोघांचा मृत्यू झाला. रविवारी पहाटे झालेल्या अपघातानंतर पोलिसांनी अल्पवयीन मुलाला विशेष हॉलिडे कोर्टात हजर करण्यात आले होते. मात्र कोर्टाने आरोपी मुलाची जामिनावर सुटका केली होती. या निर्णयामुळे अनेकांनी संताप व्यक्तदेखील केला. दुसरीकडे आता या अपघात प्रकरणावरुन राजकारण सुरु झाल्याचं पाहायला मिळत आहे. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी व्हिडीओमार्फत पुणे अपघात प्रकरणी आपला रोष व्यक्त केला आहे.
पुण्याच्या कल्याणीनगर भागात रविवारी मध्यरात्री भरधाव पोर्श कारने एका बाईकला धडक दिली होती. या धडकेत दोघांचा जागीच मृत्यू झाला. मात्र या प्रकरणातील आरोपी मुलगा हा अल्पवयीन असल्याने त्याची कोर्टाने जामिनावर सुटका केली. आरोपीला जामीन मिळाल्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. दुसरीकडे सरकारने मात्र कोर्टाची भूमिका धक्कादायक असल्याचे म्हटलं आहे. आता काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी याच प्रकरणावरुन सरकारला घेरलं आहे.
"दोघांचा बळी गेल्यानंतर तु्म्ही श्रीमंत घरातील मुलाकडून निबंध लिहून घेता म्हणत राहुल गांधींची पंतप्रधानांवर जोरदार हल्लाबोल केला. जर बस, ट्रक, ओला, उबर किंवा रिक्षा चालकाकडून झालेल्या अपघातात एखाद्याचा मृत्यू झाला तर त्यांना १० वर्षांचा तुरुंगवास सुनावला जातो. पण १६ ते १७ वर्षांचा श्रीमंत कुटुंबातील मुलगा जेव्हा दोघांचे प्राण घेतो तेव्हा त्याला निबंध लिहायला सांगितलं जातो. ट्रक आणि ओला चालकांना अशी निबंध लिहिण्याची शिक्षा का दिली जात नाही? न्याय हा सर्वांसाठी समान हवा. यासाठीच आम्ही संघर्ष करतोय. आम्ही न्यायासाठी लाढत आहोत. श्रीमंत आणि गरीब या दोघांसाठीही समान न्याय हवा," असे राहुल गांधींनी म्हटलं आहे.
नरेंद्र मोदी दो हिंदुस्तान बना रहे हैं - जहां न्याय भी दौलत का मोहताज है। pic.twitter.com/uuJHvDdeRD
— Rahul Gandhi (@RahulGandhi) May 21, 2024
"नरेंद्र मोदींनी जेव्हा देशात दोन भारत बनवले जात आहेत, एक अब्जाधीशांसाठी, एक गरिबांसाठी असा प्रश्न विचारलो जातो तेव्हा त्यांचे उत्तर मी सर्वांना गरीब करू का? असे होते. सध्या प्रश्न हा नाही, प्रश्न न्यायाचा आहे. न्याय गरीब-श्रीमंत सर्वांना सारखाच असला पाहिजे. यासाठीच आम्ही लढत आहोत. अन्यायाविरुद्ध लढत आहे," असेही राहुल गांधी म्हणाले.