नवी दिल्ली:काँग्रेस नेते राहुल गांधी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत केवळ विरोधी पक्षांचाच नाही तर पंतप्रधानपदाचाही चेहरा असतील, असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी शुक्रवारी सांगितले. ‘भारत जोडो यात्रे’बाबत त्यांनी राहुल गांधींच्या नेतृत्वाची प्रशंसा करताना वरील मत व्यक्त केले.
ई-मेलद्वारे वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले की, राहुल गांधी सत्तेचे नाही तर जनतेचे राजकारण करतात. अशा नेत्याला देशाची जनता आपसूक सिंहासनावर बसवते. पुढील लोकसभा निवडणुकीत राहुल विरोधी पक्षांचा चेहरा असू शकतात का, असे विचारले असता कमलनाथ म्हणाले, ‘जिथपर्यंत २०२४ च्या लोकसभा निवडणुकांचा प्रश्न आहे तिथपर्यंत मला वाटते की, राहुल गांधी केवळ विरोधी पक्षांचा नाही तर पंतप्रधानपदाचाही चेहरा असतील.
जगाच्या इतिहासात कोणत्याही व्यक्तीने सलग ३५०० किमीहून अधिक पायी प्रवास केलेला नाही. भारतासाठी जेवढे बलिदान गांधी घराण्याने दिले आहे, तेवढे कोणत्याही कुटुंबाने दिलेले नाही.’ काँग्रेसच्या एखाद्या वरिष्ठ नेत्याने आगामी लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी हे पंतप्रधानपदाचा चेहरा असतील, असे म्हणण्याची अलीकडच्या काळातील ही पहिलीच वेळ आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"