लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी गुरुवारी रात्री उशीरा दिल्लीतील एम्सला भेट दिली. राहुल यांनी उपचारांच्या प्रतीक्षेत असलेल्या रुग्णांची भेट घेतली आणि त्यांच्या समस्या जाणून घेत त्यांची विचारपूस केली.
राहुल गांधी यांनी एम्सच्या आसपासचे रस्ते, फुटपाथ आणि सबवे वर राहत असलेल्या अनेक रुग्णांची आणि त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. केंद्र आणि दिल्ली सरकारवर रुग्णांप्रती "असंवेदनशीलता" दाखवल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे.
राहुल गांधींच्या या भेटीचे फोटो काँग्रेसच्या ट्विटर हँडलवरून शेअर करण्यात आले आहेत. दुरून दूरवरून उपचारासाठी आलेल्या लोकांना येथे रस्ते, फुटपाथ आणि सबवेवर झोपावं लागत आहे. मोदी सरकार आणि दिल्ली सरकारने यांना असंच सोडलं आहे. आपल्या जबाबदारीकडे पाठ फिरवली आहे असं देखील कॅप्शनमध्ये म्हटलं आहे.
उपचारांसाठी महिनोनमहिने वाट पाहणं, असुविधा, सरकारची असंवेदनशीलता - हे आज दिल्ली एम्सचं वास्तव आहे. परिस्थिती अशी आहे की, आपल्या प्रियजनांच्या आजाराचं ओझं वाहून दूरदूरच्या ठिकाणाहून आलेल्या लोकांना या कडाक्याच्या थंडीत फूटपाथ आणि सबवेवर झोपावे लागत आहे असंही काँग्रेसने म्हटलं आहे.