"हे दुर्दैवी असलं तरी आम्हाला आशा आहे की..."; विनेशला अपात्र ठरवल्यानंतर राहुल गांधींनी व्यक्त केला विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2024 02:41 PM2024-08-07T14:41:34+5:302024-08-07T15:08:54+5:30

Rahul Gandhi : विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही संपूर्ण देश विनेशच्या पाठीमागे उभा असल्याचे म्हटलं आहे.

Congress Rahul Gandhi reaction after Vinesh Phogat Disqualified | "हे दुर्दैवी असलं तरी आम्हाला आशा आहे की..."; विनेशला अपात्र ठरवल्यानंतर राहुल गांधींनी व्यक्त केला विश्वास

"हे दुर्दैवी असलं तरी आम्हाला आशा आहे की..."; विनेशला अपात्र ठरवल्यानंतर राहुल गांधींनी व्यक्त केला विश्वास

Vinesh Phogat Disqualified: पॅरिस ऑलिम्पिक २०२४ च्या १२ व्या दिवशी भारतासाठी मोठी निराशाजनक बातमी समोर आली. भारतीय कुस्तीपटूविनेश फोगटने महिलांच्या ५० किलो फ्रीस्टाइलमध्ये स्थान मिळवले होते. मात्र विनेशचे पदक जिंकण्याचे स्वप्न भंगले आहे. बुधवारी सकाळी सुवर्णपदकाच्या सामन्यापूर्वी वजन करताना विनेशचे वजन १०० ग्रॅम अधिक असल्याचे आढळून आले. त्यामुळे विनेशला स्पर्धेतून अपात्र ठरवण्यात आले आहे. याचे पडसाद संपूर्ण देशभरात पाहायला मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विनेशचे कौतुक करत तिला धीर देण्याचा प्रयत्न केला. दुसरीकडे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही संपूर्ण देश विनेशच्या पाठीमागे उभा असल्याचे म्हटलं आहे.

विनेश फोगटला अपात्र ठरवण्यात आल्यामुळे भारताच्या ऑलिम्पिकमधील सुवर्णपदकाच्या आशा मावळल्या आहेत. आवश्यक मर्यादेपेक्षा केवळ १०० ग्राम वजन अधिक असल्याने विनेशला अपात्र ठरवण्यात आलं आहे. विनेश फोगटला अपात्र ठरवल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. विनेशने वजन कमी करण्यासाठी रात्रभर मेहनत केली होती. मात्र तिचे सर्व प्रयत्न अयशस्वी ठरले. विनेशला अपात्र ठरवल्यानंतर विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी एक्स पोस्टमधून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

"विश्वविजेत्या कुस्तीपटूंचा पराभव करून अंतिम फेरी गाठणारी भारताची शान विनेश फोगटला तांत्रिक कारणास्तव अपात्र ठरवण्यात आले, हे दुर्दैवी आहे. भारतीय ऑलिम्पिक संघटना या निर्णयाला जोरदार आव्हान देईल आणि देशाच्या कन्येला न्याय देईल, अशी आम्हाला पूर्ण आशा आहे. विनेश हिम्मत गमावणारी नाही, ती आणखी मजबूतपणे रिंगणात परतेल असा आम्हाला विश्वास आहे. विनेश तू नेहमीच देशाचा अभिमान वाढवला आहेस. आजही संपूर्ण देश तुझी ताकद म्हणून तुमच्या पाठीशी उभा आहे," असे राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही विनेश फोगट अपात्र ठरल्यानतंर आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. आज घडलेली घटना फार वेदनादायक आहे. मला जे काही वाटत आहे ते शब्दात मांडता आलं असतं तर बरं झालं असतं. त्याचवेळी मला तू यामधून बाहेर येण्याची क्षमता ठेवतेस याची कल्पना आहे," असे पंतप्रधान मोदींनी म्हटलं होतं. यानंतर नरेंद्र मोदींनी भारतीय ऑलिम्पिक महासंघाच्या अध्यक्षा पी. टी. उषा यांच्याबरोबर चर्चा केल्याचे समोर आलं आहे. पी.टी. उषा यांच्याकडून पंतप्रधान मोदींनी सविस्तर माहिती जाणून घेतली.

Web Title: Congress Rahul Gandhi reaction after Vinesh Phogat Disqualified

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.