“इलेक्टोरल बॉण्डमधून बळजबरीने वसुली, पंतप्रधान मोदी मास्टरमाइंड”; राहुल गांधींची टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2024 12:05 PM2024-04-16T12:05:01+5:302024-04-16T12:05:06+5:30
Rahul Gandhi News: एक दिवस सीबीआयचा तपासाला सुरुवात करते. त्यानंतर त्यांना पैसे मिळतात आणि लगेचच तपास संपतो, हे कसे ते पंतप्रधानांनी स्पष्ट करावे, असे राहुल गांधींनी म्हटले आहे.
Rahul Gandhi News: इलेक्टोरल बॉण्डमधील सर्वांत महत्त्वाची गोष्टी म्हणजे नाव आणि तारीख आहे. जर तुम्ही नाव आणि तारीख पडताळून पाहिली, तर तुम्हाला कळेल की, मोठे कॉन्ट्रॅक्ट मिळाल्यावर किंवा छापेमारी झाल्यावर लगेचच लोकांनी इलेक्टोरल बॉण्डमध्ये पैसे दिले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी पकडले गेले आहेत, अशी टीका काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी केली.
निवडणूक रोखे योजना रद्द झाल्यामुळे देश पुन्हा काळ्या पैशाकडे ढकलला गेला आहे. प्रामाणिकपणे विचार केल्यास त्याचा प्रत्येकाला पश्चात्ताप होईल. गुन्हेगारी कारवायांतील काळा पैसा तसेच अन्य स्रोतांतून आलेली बेहिशेबी रक्कम निवडणुका लढविण्यासाठी वापरली जात होती. ते रोखण्यासाठी निवडणूक रोख्यांची योजना सरकारने लागू केली होती. अर्थात ही योजना उत्तम पर्याय होता, असे आम्ही कधीही म्हटले नाही. मात्र, विरोधकांनी त्याबाबत दिशाभूल करणारी माहिती पसरविली, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका मुलाखतीत केले. यावरून राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली.
मास्टरमाइंड पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत
निवडणूक रोखे म्हणजेच इलेक्टोरल बॉण्ड जगातील सर्वांत मोठी रिकव्हरी स्कीम आहे. इलेक्टोरल बॉण्डमधून होत असलेल्या वसुलीचे मास्टरमाइंड पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. पंतप्रधानांनी स्पष्ट केले पाहिजे की, एक दिवस सीबीआयचा तपास सुरू होतो आणि त्यानंतर त्यांना पैसे मिळतात. लगेचच सीबीआयचा तपास संपतो. ही पिळवणूक आहे, असा दावा राहुल गांधी यांनी केला.
दरम्यान, भाजपच्या निवडणूक जाहीरनाम्यात गरिबांसाठी काहीही नाही. भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला अन्य सर्व राष्ट्र विचार चिरडायचे आहेत. त्यामुळेच त्यांना राज्यघटना व लोकशाही प्रक्रिया नको आहे, असा आरोप राहुल गांधींनी वायनाड येथे केला. केरळचा राज्यकारभार नागपुरातून का चालवला जावा, केरळचा राज्यकारभार स्थानिक शहरे आणि खेड्यांद्वारे चालवला गेला पाहिजे. केरळमधील शाळा कशी असावी तसेच तेथील जनतेला काय हवे आहे, हे दिल्लीला कसे कळेल, असा सवालही त्यांनी केला.