Rahul Gandhi Reaction On CBI Raid At Satyapal Malik House (Marathi News) नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमधील किरू हायड्रो इलेक्ट्रिक प्रकल्पाशी संबंधित भ्रष्टाचार प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) गुरुवारी जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्या घरावर छापा टाकला. यावरून राजकीय वातावरण तापले आहे. या प्रकरणावरून काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर राहुल गांधी यांनी लिहिले की, "शेतकऱ्यांनी एमएसपी मागितले तर त्यांना गोळ्या घ्याला - ही आहे मदर ऑफ डेमोक्रेसी? तरुणांनी नियुक्ती मागितली तर त्यांना ऐकायलाही नकार द्या - ही आहे मदर ऑफ डेमोक्रेसी? माजी राज्यपाल खरं बोलले तर त्यांच्या घरी सीबीआय पाठवा - ही आहे मदर ऑफ डेमोक्रेसी? प्रमुख विरोधी पक्षाचे बँक खाते गोठवा - ही आहे मदर ऑफ डेमोक्रेसी? कलम 144, इंटरनेट बंदी, तीक्ष्ण तारा, अश्रुधुराचे गोळे - ही आहे मदर ऑफ डेमोक्रेसी? मीडिया असो वा सोशल मीडिया, सत्याचा प्रत्येक आवाज दाबा - ही आहे मदर ऑफ डेमोक्रेसी? मोदीजी, तुम्ही लोकशाहीची हत्या केली आहे, हे जनतेला माहीत आहे आणि जनता त्याला उत्तर देईल!"
दरम्यान, जम्मू-काश्मीरमधील किरू हायड्रो इलेक्ट्रिक प्रकल्पाशी संबंधित भ्रष्टाचारप्रकरणी सीबीआयने गुरुवारी सकाळी माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्या दिल्लीतील निवासस्थानाची आणि कार्यालयाची झडती घेतली. याशिवाय, केंद्रीय एजन्सीने जम्मू-काश्मीरमधील 30 ठिकाणी छापे टाकले. यानंतर "मी शेतकऱ्याचा मुलगा आहे, मी या छाप्यांना घाबरणार नाही. मी शेतकऱ्यांसोबत आहे" असे सत्यपाल मलिक यांनी म्हटले आहे. तसेच ड्रायव्हर आणि सहाय्यक यांच्या घरावरही छापे टाकून त्यांना नाहक त्रास दिला जात असल्याचे त्यांनी म्हटले आहे. सत्यपाल मलिक यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केले आहे.
गेल्या महिन्यातही सीबीआयने या प्रकरणाच्या सुरू असलेल्या तपासासंदर्भात दिल्ली आणि जम्मू-काश्मीरमधील सुमारे 8 ठिकाणी छापे टाकले होते. सीबीआयने गेल्या महिन्यात टाकलेल्या छाप्यात 21 लाख रुपयांपेक्षा जास्त रोख रक्कम याव्यतिरिक्त डिजिटल उपकरणे, संगणक, मालमत्तेची कागदपत्रे जप्त केली होती. तसेच, सीबीआयने चिनाब व्हॅली पॉवर प्रोजेक्ट्स (प्रा.) लिमिटेडचे माजी अध्यक्ष नवीन कुमार चौधरी, माजी अधिकारी एमएस बाबू, एमके मित्तल आणि अरुण कुमार मिश्रा आणि पटेल इंजिनीअरिंग लिमिटेड यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.
चौधरी हे जम्मू आणि काश्मीर केडरचे (आता AGMUT कॅडर) 1994 च्या बॅचचे IAS अधिकारी आहेत. सत्यपाल मलिक यांनी आरोप केला होता की, ते राज्याचे राज्यपाल असताना (त्यावेळी जम्मू-काश्मीर केंद्रशासित प्रदेश झाला नव्हता) प्रकल्पाशी संबंधित दोन फाईल्स मंजूर करण्यासाठी त्यांना 300 कोटी रुपयांची लाच देऊ करण्यात आली होती. सत्यपाल मलिक 23 ऑगस्ट 2018 ते 30 ऑक्टोबर 2019 पर्यंत जम्मू-काश्मीरचे राज्यपाल होते.