नवी दिल्ली - केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन अधिकच तीव्र झालेले आहे. या आंदोलनादरम्यान बाबा राम सिंह यांनी स्वत:वर गोळी झाडून घेतली. त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले होते. तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी बाबा राम सिंह यांना श्रद्धांजली वाहत मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. "अनेक शेतकऱ्यांनी बलिदान दिलं आहे. मोदी सरकारने मात्र क्रौर्याच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत" असं म्हणत राहुल गांधींनी हल्लाबोल केला आहे.
राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून यांनी बाबा राम सिंह यांना श्रद्धांजली वाहिली आहे. "कुंडली सीमेवरील शेतकर्यांची दुर्दशा पाहून व्यथीत झालेल्या कर्नालच्या संत बाबा राम सिंह यांनी आत्महत्या केली आहे. या दुःखाच्या क्षणी आपल्या संवेदना आणि श्रद्धांजली. अनेक शेतकऱ्यांनी आपलं बलिदान दिलं आहे. मोदी सरकारने क्रौर्याच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. सरकारने जिद्द सोडावी आणि कृषी कायदे त्वरित मागे घ्यावे"असं ट्विट राहुल गांधी यांनी केलं आहे.
काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनीही शोक व्यक्त केला आहे. "हे राम, ही काय वेळ आली आहे? हे कोणतं युग आहे, जिथे संत देखील व्यथित आहेत. संत राम सिंह यांनी शेतकर्यांचे दु: ख पाहून आपल्या जीवाचं बलिदान दिलं. ही अतिशय धक्कादायक घटना आहे. त्यांचा मृत्यू हा मोदी सरकारच्या क्रौर्याचा परिणाम आहे" असं रणदीप सुरजेवाला यांनी म्हटलं आहे. बाबा बुड्ढा साहेबजी प्रचारक सभा, कर्नालचे सचिव आणि बाबा राम सिंह यांचे शिष्य असलेले गुलाब सिंह यांनी आता बाबांच्या आत्महत्येमागचं कारण स्पष्ट केलं आहे.
गुलाब सिंह यांनी सांगितले की, मी १९९६ पासून बाबा राम सिंह यांचा शिष्य आहे. बाबाजींचा जन्म पंजाबमधील जगरांव येथे झाला होता. ते सहा बहिणींमधील एकुलते एक भाऊ होते. मी त्यांच्याकडून कीर्तन मिळवले होते. दरम्यान, सर्व शंकांचे निरसन करण्यासाठी सध्या बाबांच्या पार्थिवाचे शवविच्छेदन केले जात आहे. गुलाब सिंह म्हणाले की, जेव्हा ही घटना घडली तेव्हा भाई मनजित सिंह त्यांच्या शेजारी होते. ते बाबांचे राम सिंह यांचे हुजूरी सेवक आहेत. ते प्रत्येकवेळी बाबांसोबत असतात. ८ आणि ९ डिसेंबर रोजी बाबाजींनी कर्नालमध्ये अरदास समागम आयोजित केला होता. त्यामध्ये अनेक जत्थे सहभागी झाले होते. ९ डिसेंबर रोजी बाबाजींनी शेतकरी आंदोलनाला पाच लाख रुपयांची देणगी दिली होती. त्यानंतर बाबाजी तिथे उबदार चादरींचे वाटप करून आले होते. ते दररोज आंदोलनाच्या ठिकाणी जायचे. दररोज डायरी लिहायचे. म्हणायचे की मला हे दु:ख पाहावत नाही.
…म्हणून संत बाबा राम सिंह यांनी स्वत:वर झाडून घेतली गोळी, शिष्याने सांगितली घटनेमागची कहाणी
दरम्यान, बुधवारी बाबा राम सिंह पुन्हा एकदा आंदोलनस्थळी पोहोचले होते. तिथे त्यांनी आपल्या सेवादारांना स्टेजवर जाण्यास सांगितले. त्यादरम्यान, सर्वजण तिथून निघून गेले. बाबा राम सिंह गाडीत बसलेले होते. त्यानंतर त्यांनी एक पत्र लिहिले. या पत्रात त्यांनी लिहिले की, शेतकरी आंदोलनामुळे दु:खी होऊन अनेक बांधवानी आपली नोकरी सोडली आहे. आपल्याला मिळालेले मान-सन्मान परत केले आहेत. अशा परिस्थिती मी माझे शरीर या आंदोलनाला समर्पित करत आहेत. त्यांच्याकडील पिस्तूल कारमध्ये पडलेले होते. तेच घेऊन त्यांनी स्वत:ला शहीद करून घेतले. शेतकरी आंदोलनासाठी त्यांनी बलिदान दिले.