नवी दिल्ली:उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमध्ये माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. काही तरुणांनी एका वृद्ध मुस्लीम व्यक्तीला बेदम मारहाण केल्याचा भयंकर प्रकार समोर आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे त्यांना 'जय श्री राम' बोलण्याची सक्ती केल्याची माहिती मिळाली आहे. याबाबत काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी प्रतिक्रिया दिली असून, श्रीरामांचे खरे भक्त असं करु शकतात, हे मानायला तयार नाही, असे त्यांनी म्हटले आहे. (congress rahul gandhi reacts on ghaziabad incident elderly man beaten)
गाझियाबाद जिल्ह्यातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडिओत काही तरुणांनी वृद्ध मुस्लीम व्यक्तीला मारहाण केली आहे. एका तरुणाने त्या वृद्ध माणसाची दाढी कात्रीने कापली. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आणि तपास सुरू केला. या घटनेवर राहुल गांधी यांनी ट्विटरच्या माध्यमातून प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
श्रीरामांचे खरे भक्त असं करु शकतात?
मी हे मान्य करायला तयार नाही की, श्रीरामांचे खरे भक्त असे करु शकतात, अशी क्रौर्यता माणुसकीपासून दूर आहे आणि ती समाज आणि धर्म या दोघांसाठीही लाजिरवाणी आहे, असे राहुल गांधी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. त्यापूर्वी प्रभू श्रीराम हे स्वत: न्याय आहेत, सत्य आहेत, धर्म आहेत. त्यांच्या नावाने धोकेबाजी हा अधर्म आहे, असे राहुल गांधींनी म्हटले होते.
दरम्यान, अब्दुल समद सैफी बुलंदशहर येथील रहिवासी असून लोणी येथे जात असताना त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. अतुल कुमार सोनकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, आम्हाला हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ही माहिती मिळाली. ज्यामध्ये एका वृद्ध व्यक्तीवर हल्ला करण्यात आला होता. व्हिडीओमध्ये एक व्यक्ती सैफी यांना मारहाण करताना आणि दाढी कापण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसत आहे. व्हिडीओमधील आरोपी गाझियाबाद येथील रहिवासी असून प्रवेश गुर्जर असं त्याचं नाव असल्याची माहिती मिळत आहे.