जिग्नेश-कन्हैयाच्या माध्यमानं नव्या प्रयोगासाठी काँग्रेस तयार; असं आहे राजकारण, पण...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2021 08:45 AM2021-09-28T08:45:51+5:302021-09-28T08:46:37+5:30
काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी 2007 मध्ये पक्षाचे सरचिटणीस म्हणून युवक काँग्रेस आणि एनएसयूआयमध्ये अंतर्गत निवडणुकांची सुरुवात केली होती. याचा उद्देश, अगदी तळागाळातील युवक कार्यकर्त्यांना पुढे येण्याची संधी देण्याचा होता. पण...
नवी दिल्ली - एकामागून एक निवडणुकीत पराभवाला सामोरे जाणारी काँग्रेस आता आणखी एक नवा प्रयोगासाठी सज्ज आहे. आंदोलनातून समोर येणाऱ्या तरुणांना पक्षात स्थान देऊन निवडणुकीत विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचण्याची काँग्रेसची इच्छा आहे. जेएनयू विद्यार्थी संघटनेचा माजी अध्यक्ष कन्हैया कुमार आणि गुजरातचे आमदार आणि दलित नेते जिग्नेश मेवानी हे पक्षाच्या रणनीतीचा एक भाग आहेत. हे दोन्ही तरूण नेते मंगळवारी काँग्रेसमध्ये सामील होण्याची शक्यता आहे.
कन्हैया कुमार आणि जिग्नेश मेवानी, हे देशभरातील तरुणांना काँग्रेसशी जोडण्याच्या पक्षाच्या योजनेचा एक भाग आहेत. सर्व राज्यांतील तरुणांना जोडण्यासाठी काँग्रेस एक मोहीम राबविण्याची तयारी करत आहे. राजकारणात प्रयोग करण्याची ही काँग्रेसची पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही काँग्रेसचे अनेक प्रयोग केले आहेत. मात्र, या प्रयोगांचे परिणाम फारसे उत्साहवर्धक ठरले नाहीत.
काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी 2007 मध्ये पक्षाचे सरचिटणीस म्हणून युवक काँग्रेस आणि एनएसयूआयमध्ये अंतर्गत निवडणुकांची सुरुवात केली होती. याचा उद्देश, अगदी तळागाळातील युवक कार्यकर्त्यांना पुढे येण्याची संधी देण्याचा होता. हा एक अतिशय चांगला प्रयोग होता. मात्र, राज्यांतील वरिष्ठ नेत्यांच्या घरांशी संबंध असलेले युवकच पैशाच्या बळावर निवडणुका जिंकून पदाधिकारी बनले.
कॉंग्रेसने 2019 च्या लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार ठरविण्यासाठी डेटाचा वापर केला होता. पक्षाने 300 जागांसाठी डेटाच्या विश्लेषणाच्या आधारे उमेदवार ठरविण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्यांचा हा प्रयत्न अयशस्वी ठरला. असे अनेक प्रयोग यापूर्वी काँग्रेसने केले आहेत. असे असताना, आता कन्हैया आणि जिग्नेश यांच्या माध्यमाने तरुणांना जोडण्यात काँग्रेसचा प्रयोग किती यशस्वी होणार, हे येणारा काळच ठरवेल.