काँग्रेसचे नेते राहुल गांधी य़ांनी पुन्हा एकदा सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "पुलवामा हल्ल्याला 5 वर्षे! कोणतीही सुनावणी नाही, आशा नाही आणि असंख्य प्रश्न ज्यांची उत्तरं अद्याप मिळालेली नाहीत" असं राहुल यांनी म्हटलं आहे. यासोबतच एक व्हिडीओ देखील शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये शहीद कुटुंबियांच्या व्यथा मांडण्यात आल्या आहेत.
बुधवारी सकाळी राहुल गांधी यांनी पुलावामा हल्ल्यातील शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली. "पुलवामा दहशतवादी हल्ल्यातील शूर शहीदांना सलाम आणि विनम्र श्रद्धांजली. भारताच्या संरक्षणासाठी समर्पित केलेल्या त्यांच्या सर्वोच्च बलिदानाबद्दल देश त्यांचा सदैव ऋणी राहील" असं राहुल गांधी यांनी म्हटलं होतं. 14 फेब्रुवारी ही तारीख भारताच्या इतिहासात एक दुःखद तारीख म्हणून नोंदवली जाते. या तारखेला 2019 मध्ये पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याने देश हादरला.
केंद्रीय राखीव पोलीस दलाचा ताफा श्रीनगर जम्मू महामार्गावरून जात होता. संपूर्ण ताफ्यात 78 वाहने होती, ज्यामध्ये 2,547 जवान होते. ताफा पुलवामा येथे पोहोचताच जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांनी ताफ्याच्या वाहनासह 350 किलो स्फोटकांनी भरलेल्या एसयूव्हीला धडक दिली. स्फोटात बसलेल्या दोन बसपैकी एका बसचे तुकडे झाले.
पुलवामा हल्ल्यात 40 जवान शहीद झाले होते. काश्मीरमध्ये 30 वर्षांतील हा सर्वात मोठा हल्ला होता. पुलवामा हल्ल्याच्या 13 दिवसांनंतर भारताने बदला घेतला. भारतीय हवाई दलाची मिराज विमानं पाकिस्तानात घुसली आणि जैशच्या सर्वात मोठ्या दहशतवादी तळावर बॉम्बस्फोट करून ते उद्ध्वस्त केलं. बालाकोटमध्ये बॉम्ब टाकले होते. यामध्ये 350 दहशतवादी मारले गेल्याचा दावा करण्यात आला होता.