“पंतप्रधान मोदी जातिनिहाय जनगणना करण्यास का घाबरतात?”; राहुल गांधींचा थेट सवाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2024 16:17 IST2024-02-06T16:16:55+5:302024-02-06T16:17:51+5:30
Rahul Gandhi Vs BJP: लोकसभेत केलेल्या भाषणावरून राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर पलटवार केला आहे.

“पंतप्रधान मोदी जातिनिहाय जनगणना करण्यास का घाबरतात?”; राहुल गांधींचा थेट सवाल
Rahul Gandhi Vs BJP: लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली. यानंतर आता काँग्रेसकडून भाजपावर पलटवार केला जात आहे. ओबीसी समाजासंदर्भात पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेसवर केलेल्या टीकेला खासदार राहुल गांधी यांनी प्रत्युत्तर दिले. तप्रधान मोदी जातिनिहाय जनगणना करण्यास का घाबरतात, असा सवालही राहुल गांधी यांनी केला आहे.
काँग्रेस पक्ष आणि यूपीए सरकारने ओबीसींना न्याय दिला नाही. ओबीसी समाजावर अन्याय केला. काही दिवसांपूर्वी कर्पूरी ठाकूर यांना भारतरत्न प्रदान करण्यात आला. त्यांचा आम्ही सन्मान केला. सन १९७० मध्ये जेव्हा ते मुख्यमंत्री झाले, तेव्हा त्यांच्या सरकारला अस्थिर करण्यासाठी अनेक गोष्टी केल्या गेल्या. त्यांना विरोधी पक्षनेता म्हणून स्वीकारण्यास नकार दिला. ज्या संविधानासाठी कर्पूरी ठाकूर यांनी जीवन व्यक्तीत केले, त्याग केला, त्यांचा अपमान काँग्रेसने केला. ओबीसीसाठी भाजपाने काय केले, असा प्रश्न विचारतात, पण पंतप्रधानपदी असलेली ओबीसी व्यक्ती दिसत नाही का, यापेक्षा आणखी कोणते मोठे उदाहरण द्यायचे, असे सांगत पंतप्रधान मोदी यांनी टीका केली होती. यावर राहुल गांधींनी पलटवार केला.
पंतप्रधान मोदी जातिनिहाय जनगणना करण्यास का घाबरतात?
राहुल गांधी यांनी एक्सवर एक पोस्ट केली आहे. देशात श्रीमंत आणि गरीब अशा दोनच जाती आहेत, असे पंतप्रधान अनेकदा सांगत होते, पण आज संसदेत त्यांनी स्वत:ला ‘सर्वात मोठा ओबीसी’ म्हणून संबोधले. कोणाला लहान तर कोणाला मोठे समजण्याची ही मानसिकता बदलणे गरजेचे आहे. ओबीसी असो, दलित असो वा आदिवासी असो, त्यांची जनगणना केल्याशिवाय त्यांना आर्थिक आणि सामाजिक न्याय मिळू शकत नाही. मोदीजी इकडचे तिकडचे खूप बोलतात पण जातिनिहाय जनगणनेला का घाबरतात, असा सवाल राहुल गांधी यांनी केला आहे.
दरम्यान, आता आमच्या सरकारचा तिसरा कार्यकाळ दूर नाही. जास्तीत जास्त १०० ते १२५ दिवस राहिले आहेत. केवळ काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे नाही, तर संपूर्ण देश सांगत आहे की, ‘अब की बार ४०० पार’. शक्यतो या आकड्यांच्या खेळात जात नाही. मात्र, देशाचे मत आणि सूर समजू लागला आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीला ४०० पेक्षा जास्त जागा मिळतीलच, मात्र भारतीय जनता पार्टीला ३७० जागांवर विजयी करतील, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला.