महात्मा गांधी म्हणजे सूर्य, शाखेत जाणाऱ्यांचे प्रमाणपत्र नको; राहुल गांधींचे PM मोदींना उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2024 08:54 AM2024-05-30T08:54:49+5:302024-05-30T08:55:51+5:30
Rahul Gandhi Replied PM Narendra Modi: शाखांमध्ये जाणाऱ्यांना ते गांधीजींना समजू शकत नाहीत. ते गोडसेच्या विचाराने चालतात, अशी टीका राहुल गांधींनी केली.
Rahul Gandhi Replied PM Narendra Modi: लोकसभा निवडणुकीच्या अखेरच्या सातव्या टप्प्यातील मतदान ०१ जून रोजी होणार आहे. तर, ०४ जून रोजी मतमोजणी आहे. शेवटच्या टप्प्यातील प्रचाराला चांगलाचा वेग आल्याचे पाहायला मिळत आहे. यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महात्मा गांधी यांच्याविषयी केलेल्या एका विधानावरून आता विरोधकांकडून टीका केली जात असून, काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
जगाला महात्मा गांधी यांच्याविषयी सिनेमाच्या माध्यमातून माहिती मिळाली. १९८२ मध्ये रिचर्ड एटनबरो यांनी 'गांधी' हा सिनेमा बनवला. त्यानंतर जगभरातील लोकांना महत्मा गांधींविषयी माहिती मिळाली. तोपर्यंत जगाला गांधींबाबत जास्त माहिती नव्हते, असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला होता. यानंतर आता राजकीय वर्तुळातून यावर प्रतिक्रिया उमटत असून, राहुल गांधी यांनी एक्सवर एक व्हिडिओ शेअर करत पंतप्रधान मोदी यांना प्रत्युत्तर दिले आहे.
शाखेत जाणाऱ्यांचे प्रमाणपत्र नको
महात्मा गांधी हे सूर्य आहेत. ज्यांनी संपूर्ण जगाला अंधाराशी लढण्याची ताकद दिली. जगाला सत्य आणि अहिंसेच्या रूपात एक मार्ग दाखवला, जो दुर्बल माणसालाही अन्यायाविरुद्ध उभे राहण्याची हिंमत देतो. त्यांना कोणत्याही ‘शाखा शिक्षित’ प्रमाणपत्राची गरज नाही. शाखांमध्ये ज्यांचा जागतिक दृष्टीकोन बनतो, ते गांधीजींना समजू शकत नाहीत. ते गोडसेला समजतात. ते गोडसेच्या रस्त्याने चालतात. गांधीजी संपूर्ण जगासाठी प्रेरणादायी होते. मार्टिन ल्युथर किंग ज्युनिअर, नेल्सन मंडेला, अल्बर्ट आइनस्टाइन या सर्वांनी गांधींपासून प्रेरणा घेतली. हिंदुस्तानातील कोट्यवधी लोक गांधींजींच्या मार्गावर चालतात. अहिंसा आणि सत्याच्या मार्गावर चालतात. लढाई सत्य आणि असत्यामध्ये आहे. हिंसा आणि अहिंसेमध्ये लढाई आहे, असे राहुल गांधी यांनी सोशल मिडिया पोस्टमध्ये म्हटले आहे.
दरम्यान, महात्मा गांधी जगातील महान आत्मा होते. या ७५ वर्षात गांधीजींबद्दल जगाला माहिती देण्याची जबाबदारी आपली नव्हती का, अशी विचारणा पंतप्रधान मोदी यांनी केली. तसेच जर जग मार्टिन ल्युथर किंग, नेल्सन मंडेला आणि अन्य नेत्यांबाबत जाणते. पण गांधीजी त्यांच्यापेक्षा कमी नव्हते. तुम्हाला हे स्वीकारावे लागेल. जगभरात फिरल्यानंतर हे सांगत आहे, असेही पंतप्रधान मोदी यांनी म्हटले होते.