नवी दिल्ली - देशातील उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांचं बिगुल वाजलं आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीच्या कार्यक्रमाची घोषणा केली आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार सात टप्प्यामध्ये होणार मतदान होणार आहे. सर्वात मोठं राज्य असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये सर्वाधिक टप्प्यात सात टप्प्यात मतदान होणार आहे. याच दरम्यान आता सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. काँग्रेस देखील आता सज्ज झाली आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधींच्या एका ट्विटची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे.
राहुल गांधी (Congress Rahul Gandhi) यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. "द्वेषाला हरवण्याची हीच योग्य वेळ आहे" असं राहुल यांनी म्हटलं आहे. यासोबतच त्यांनी Elections2022 हा हॅशटॅग देखील वापरला आहे. पाच राज्यात एकूण सात टप्प्यात मतदान होणार आहे. एकूण ४०३ आमदार असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये सर्व सात टप्प्यांत मतदान होणार आहे. त्यातील पहिल्या टप्प्याचे मतदान १० फेब्रुवारी रोजी होणार आहे. तर शेवटच्या टप्प्यातील मतदान हे ७ मार्च रोजी होणार आहे. तर मतमोजणी ही १० मार्च रोजी होईल. पंजाब, उत्तराखंड आणि गोव्यामध्ये एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. या तिन्ही राज्यांमध्ये १४ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. तर मणिपूरमध्ये दोन टप्प्यात मतदान होणार आहे.
मणिपूरमध्ये २७ फेब्रुवारी आणि ३ मार्च अशा दोन टप्प्यात मतदान होणार आहे. तर उत्तर प्रदेशमध्ये १०, १४, २०, २३, २७ फेब्रुवारी आणि ३ व ७ मार्च अशा एकूण सात टप्प्यात मतदान होईल. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ह्या निवणुका होत असल्याने निवडणूक आयोगाने त्यासाठी काही खास उपाययोजना केल्या आहेत. कोरोनाकाळात निवडणूक घेणे आव्हानात्मक असल्याचे सांगत मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा म्हणाले की, कोरोनाकाळात सुरक्षितपणे निवडणुका घेणे ही आमची जबाबदारी आहे. वेळेत निवडणुका घेणे ही आमची जबाबदारी असून, कोरोनाचे सर्व नियम पाळून ह्या निवडणुका घेतल्या जातील. प्रत्येक बुथवर मास्क आणि सॅनिटायझरची व्यवस्था केली जाईल.
१५ जानेवारीपर्यंत कुठल्याही सभा, पदयात्रा, सायकल यात्रा यावर निवडणूक आयोगाने बंदी घातली आहे. याबाबत पुढील निर्णय नंतर घेण्यात येईल, असे निवडणूक आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. २०१७ मधे झालेल्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपाने ३०० हून अधिक जागा जिंकत विजय मिळवला होता. तर उत्तराखंडमध्येही भाजपाने निर्विवाद वर्चस्व राखले होते. गोवा आणि मणिपूरमध्ये त्रिशंकू निकालांनंतर बहुमताची जुळवाजुळव करत सरकार स्थापन केले होते. तर पंजाबमध्ये काँग्रेसने स्पष्ट बहुमतासह सत्ता स्थापन केली होती.