पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी (15 ऑगस्ट) स्वातंत्र्य दिनानिमित्त लाल किल्ल्यावरून सलग अकराव्यांदा देशाला संबोधित केलं. लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनीही या कार्यक्रमात सहभाग घेतला. स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्यात राहुल गांधी ऑलिम्पिक पदक विजेत्या खेळाडूंसोबत चौथ्या रांगेत बसलेले दिसले. सोशल मीडियावर याची जोरदार चर्चा रंगली आहे. काँग्रेसने यावरून संताप व्यक्त केला आहे.
ऑलिम्पिक पदक विजेते राहुल गांधींच्या पुढे बसलेले दिसतात. ते ज्या रांगेत बसले आहेत, तिथे त्यांच्यासोबत हॉकी टीमचे काही खेळाडूही बसले आहेत. राहुल यांच्या मागे आणखी काही पाहुणे बसले आहेत. दहा वर्षात पहिल्यांदाच विरोधी पक्षाचे नेते लाल किल्ल्यावर स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्याला उपस्थित होते. अशा स्थितीत त्यांना पाठीमागे बसवण्यावरून वाद निर्माण झाला आहे. मात्र, या संपूर्ण प्रकरणावर सरकारने प्रतिक्रिया दिली आहे.
राहुल गांधींना पाठीमागे बसवल्यामुळे काँग्रेसने यावरून राजकारण केलं जात असल्याचा आरोप केला आहे. काँग्रेसचे राज्यसभा खासदार विवेक तन्खा म्हणाले की, "संरक्षण मंत्रालय इतकं वाईट का वागत आहे? लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना चौथ्या रांगेत बसवलं. विरोधी पक्षनेतेपद मोठं आहे. लोकसभेत ते पंतप्रधानांच्या नंतर येतं. तुम्ही संरक्षण मंत्रालयाला राष्ट्रीय कार्यक्रमाचे राजकारण करण्याची परवानगी कशी देऊ शकता?"
राहुल गांधी यांच्या बसण्यावरून होत असलेल्या राजकारणावरही सरकारकडून प्रतिक्रिया देण्यात आली आहे. संरक्षण मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे की, यावेळी पुढची रांग ऑलिम्पिक पदक विजेत्यांसाठी अलॉट करावी लागली. त्यामुळे राहुल गांधींना मागच्या रांगेत बसावं लागलं. स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रमाचं आयोजन करणं आणि बसण्याची योजना करं ही संरक्षण मंत्रालयाची जबाबदारी असते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यावेळी काही केंद्रीय मंत्र्यांनाही मागे बसावं लागलं आहे.