Rahul Gandhi News: मध्य प्रदेशमधीलउज्जैन येथे १२ वर्षीय मुलीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली. या मध्य प्रदेशातील निर्भया घटनेमुळे संपूर्ण देश हादरला आहे. या घटनेनंतर देशभरातील विरोधक मध्य प्रदेश सरकार, भाजप आणि मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्यावर सडकून टीका करताना दिसत आहेत. काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनीही उज्जैन निर्भया प्रकरणी जोरदार हल्लाबोल केला असून, निवडणुकीच्या प्रचारात मुलीच्या किंकाळ्या दबल्या गेला, असे सांगत निशाणा साधला आहे.
उज्जैन येथे १२ वर्षीय मुलीवर अमानवी अत्याचार करून नराधमांनी तिला रस्त्यावर फेकले. यानंतर पीडित मुलीने मदत मागण्याचा प्रयत्न केला. मात्र, कुणीच तिच्या मदतीसाठी पुढे सरसावले नाही. याबाबतचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या घटनेवर देशभरातून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. राहुल गांधी यांनीही भाजपवर टीका केली.
निवडणूक प्रचारात मुलीच्या किंकाळ्या दबल्या
मध्य प्रदेशमध्ये एका १२ वर्षांच्या मुलीबरोबर भयानक गुन्हा घडला. त्यामुळे भारत मातेच्या हृदयवर मोठा आघात झाला आहे. मध्य प्रदेशमध्ये महिलांवरील गुन्हे आणि अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराची संख्या सर्वाधिक आहे. याला ज्यांनी गुन्हा केला ते गुन्हेगार तर जबाबदार आहेतच, शिवाय राज्यातील भाजप सरकारही जबाबदार आहे. भाजप सरकार मुलींचे संरक्षण करण्यास सक्षम नाही. मध्य प्रदेशमध्ये न्याय, कायदा सुव्यवस्था राहिली नाही. ना अधिकार आहेत. मध्य प्रदेशमधील मुलींच्या परिस्थितीवर संपूर्ण देशाला लाज वाटते आहे. मात्र, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री आणि देशाचे पंतप्रधान दोघांना लाज वाटत नाही. निवडणुकीचा प्रचार, भाषणे, खोटी आश्वासने आणि फसव्या घोषणांमध्ये मुलींचा आवाज अन् किंकाळ्या दबल्या जात आहेत, अशी घणाघाती टीका राहुल गांधी यांनी केली.
दरम्यान, याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोषींची लवकरात लवकर ओळख पटवण्यासाठी आणि त्यांना जेरबंद करण्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) तयार करण्यात आले आहे. पीडित मुलगी नेमकी कुठली आहे? याबाबत ती काहीही सांगू शकली नाही. मात्र तिच्या बोलण्यावरून ती उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.