नांदेड येथील शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात उपचार घेणाऱ्या आणखी चार नवजातांसह एकूण 7 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे गेल्या 48 तासांत एकूण मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या आता 31 झाली आहे. सोमवारी मध्यरात्री 12 ते मंगळवारी मध्यरात्री 12 वाजेदरम्यान म्हणजे मागील 24 तासांत आणखी 7 जणांचा मृत्यू झाला. यात 4 नवजात बालक, 3 प्रौढ यांचा समावेश आहे.
24 तासांत 24 जणांचा मृत्यू झाल्याने अख्खा महाराष्ट्र हादरला आहे. आता एकूण मृत्यूंची संख्या आता 31 वर पोहोचली आहे. याच घटनेवरून अनेक राजकीय नेत्यांनी आपला संताप व्यक्त केला आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी देखील नांदेड घटनेवरून भाजपावर जोरदार हल्लाबोल केला आहे. "भाजपा सरकार आपल्या प्रचारावर हजारो कोटी रुपये खर्च करते, पण मुलांच्या औषधांसाठी पैसे नाहीत?" असा सवाल विचारला आहे. तसेच "भाजपाच्या नजरेत गरिबांच्या जीवाची किंमत नाही" असं म्हणत हल्लाबोल केला आहे.
राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "महाराष्ट्रातील नांदेड येथील शासकीय रुग्णालयात औषधांच्या कमतरतेमुळे 12 नवजात बालकांसह 24 जणांचा मृत्यू झाल्याची बातमी अत्यंत दुःखद आहे. मी सर्व शोकग्रस्त कुटुंबांप्रती मनापासून संवेदना व्यक्त करतो. भाजपा सरकार आपल्या प्रचारावर हजारो कोटी रुपये खर्च करते, पण मुलांच्या औषधांसाठी पैसे नाहीत? भाजपाच्या नजरेत गरिबांच्या जीवाची किंमत नाही" असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.
नांदेड येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात सक्षम आरोग्यसेवेअभावी 24 तासांत 24 रुग्णांचा मृत्यू होण्याची घटना गंभीर आहे. त्याची चौकशी झालीच पाहिजे. मात्र, याच रुग्णालयात 70 रुग्ण गंभीर अवस्थेत असून, राज्य सरकारने युद्धपातळीवर निर्णय घेऊन त्या रुग्णांचे प्राण वाचवावे, असे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे.