नवी दिल्ली - काँग्रेस नेते राहुल गांधी (Congress Rahul Gandhi) यांनी महागाईसह इतर मुद्द्यांवरून केंद्र सरकारवर पुन्हा एकदा हल्लाबोल केला आहे. भारतातील पेट्रोलचे दर, बेरोजगारी आणि जातीय हिंसाचाराचा आलेख श्रीलंकेसारखाच असून सरकारने लोकांचे लक्ष त्यापासून हटवू नये असं म्हटलं आहे.
इंधनाचे वाढते दर आणि बेरोजगारी यासह आपले अपयश लपवण्यासाठी केंद्र सरकार जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप राहुल गांधींनी मोदी सरकारवर केला आहे. ट्विटरवर एक ग्राफिक इमेज शेअर करत त्यांनी लोकांची दिशाभूल केल्याने वस्तुस्थिती बदलणार नाही. भारताची स्थिती पूर्णपणे श्रीलंकेसारखी दिसते असं म्हटलं आहे. राहुल गांधींनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे.
ग्राफमध्ये भारत आणि श्रीलंकेतील पेट्रोलच्या किमती, बेरोजगारी आणि हिंसाचाराच्या घटनांशी संबंधित आलेखाची तुलना करताना राहुल गांधी यांनी हे सांगितले. इतकेच नाही तर महागाई, बेरोजगारी आणि हिंसाचार या मुद्द्यांवरही भारत श्रीलंकेच्या मार्गावर पुढे जात असल्याचे राहुल गांधी म्हणाले.
महागाई, बेरोजगारी या मुद्द्यांवरून राहुल गांधींनी भाजपा सरकारवर हल्लाबोल करण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी एका सभेत त्यांनी मोदी सरकारवर देशाची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त केल्याचा आरोप केला होता. ते म्हणाले की, पंतप्रधान मोदींनी नोटाबंदी आणि जीएसटी चुकीच्या पद्धतीने लागू केला, त्यामुळे अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला.