नवी दिल्ली - कोरोना व्हायरस, लॉकडाऊन, भारत-चीन तणाव, शेतकरी आंदोलन यासह विविध मुद्द्यांवरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मोदी सरकारवर (Modi Government) जोरदार हल्लाबोल करत आहे. यानंतर आता पुन्हा एकदा राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला असून टीकास्त्र सोडलं आहे. "जवान नाही, शेतकरीही नाही, मोदी सरकारसाठी 3-4 उद्योजक मित्रच देव आहेत" असं म्हणत राहुल यांनी जोरदार टीका केली आहे. अर्थसंकल्पात सैनिकांच्या पेन्शन कपातीच्या मुद्द्यावरून राहुल गांधींनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे.
राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा केंद्रीय अर्थसंकल्पावरून मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. हा अर्थसंकल्प शेतकरी व जवानांच्या हिताचा नसून फक्त उद्योजकांच्या फायद्याचा असल्याची टीका राहुल गांधी यांनी केली आहे. राहुल यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. "अर्थसंकल्पात सैनिकांच्या पेन्शनमध्ये कपात. जवानही नाही, शेतकरीही नाही मोदी सरकारसाठी तीन-चार उद्योजक मित्रच देव आहेत" असं राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
काँग्रेसचे नेते राहुल गांधी आपल्या एका ट्विटमुळे जोरदार चर्चेत आले आहेत. राहुल यांनी बुधवारी (3 फेब्रुवारी) पंतप्रधान नरेंद्र मोदींचं नाव न घेता अप्रत्यक्षपणे हल्लाबोल केला आहे. जगभरातील काही हुकुमशहांची नावं त्यांनी ट्विटद्वारे जाहीर केली आहेत. तसेच या सर्व हुकुमशहांची नावं ‘M’ या अद्याक्षरानेच का सुरू होतात असा प्रश्नही त्यांनी विचारला आहे होता. मात्र त्यांच्या या ट्विटला आता भाजपाने जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. थेट पूर्वजांच्या नावांची आठवण करून देत भाजपाने जोरदार निशाणा साधला आहे. तसेच काँग्रेसही राहुल यांच्या वक्तव्याला गंभीरतेने घेत नाही म्हणत टीका केली आहे.
"'M' पासून मोतीलाल नेहरू यांचंही नाव येतं हे राहुल गांधी विसरले वाटतं", भाजपाने लगावला सणसणीत टोला
केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी राहुल गांधींना उत्तर दिलं आहे "राहुल गांधी यांच्या वक्तव्याला काँग्रेसही गंभीरतेने घेत नाही. जर एमपासून सुरू केलं तर मोतीलाल नेहरू यांचंही नाव येतं. त्यामुळे त्यांनी जरा बघून टिप्पणी करायला हवी" असं म्हणत तोमर यांनी राहुल गांधींना सणसणीत टोला लगावला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं होतं. "Marcos (मार्कोस), Mussolini (मुसोलिनी), Milošević (मिलोसेविक), Mubarak (मुबारक), Mobutu (मोबुतू), Musharraf (मुशर्रफ), Micombero (मायकोंबेरो) या सर्व हुकुमशहांची नावं ‘M’ नेच का सुरू होतात?" असं राहुल गांधी यांनी म्हटलं होतं.
"राहुल गांधींची देश तोडण्याची भाषा, पोलिसांप्रती सहानुभूतीचा एक शब्दही नाही"
प्रजासत्ताक दिनप्रसंगी ट्रॅक्टर रॅलीदरम्यान झालेल्या हिंसाचारात 300 हून अधिक पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. हे पोलीस कर्मचारी लाल किल्ला, आयटीओ आणि नांगलौईसह इतर ठिकाणी झालेल्या हिंसाचारात जखमी झाले. याच दरम्यान राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला होता. भाजपा नेत्या स्मृती इराणी यांनी राहुल गांधींना प्रत्युत्तर दिलं. स्मृती इराणी यांनी राहुल गांधी देश तोडण्याची भाषा करत आहेत. दिल्लीत शेतकरी आंदोलनात हिंसेचं रुप आल्यानंतर अनेक पोलीस, मीडिया प्रतिनिधी जखमी झाले. मात्र त्यांच्याप्रती राहुल गांधींनी एकही सहानुभूतीचा शब्द वापरला नाही असं म्हटलं आहे. "26 जानेवारी दिल्लीत झालेल्या हिंसाचारात 300 पेक्षा जास्त पोलीस जखमी झाले आहेत. याशिवाय काही पत्रकारही जखमी झाले आहेत. अनेक महिला पोलिसांवर हल्ला झाला. मीडिया प्रतिनिधींवर हल्ला झाला. त्यांना ट्रॅक्टरने चिरडण्याचा प्रयत्न झाला. त्यांच्याप्रती राहुल गांधी यांच्या तोंडातून एकही संवेदशील शब्द निघाला नाही" असं स्मृती इराणी यांनी म्हटलं आहे.