नवी दिल्ली - कोरोनामुळे देशातील परिस्थिती गंभीर झाली आहे. गेल्या 24 तासांत रुग्णसंख्येत विक्रमी वाढ झाली असून धडकी भरवणारी आकडेवारी समोर आली आहे. रुग्णसंख्येने पुन्हा एकदा रेकॉर्ड मोडला आहे. देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहे. तर दुसरीकडे इंधन दरवाढ सुरू आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशावर दरवाढीचा भार आला आहे. कोरोना व्हायरस, पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमतीवरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे.
गेल्या काही दिवसांपासून राहुल गांधी कोरोना व्हायरस, भारत-चीन संघर्ष यावरून जोरदार हल्लाबोल करत आहेत. त्यानंतर राहुल यांनी आज पुन्हा एकदा आपल्या ट्विटर अकाऊंटवरून मोदी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. इंधन दरवाढीचा भडका आणि कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने होत असलेली वाढ यावरून त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. "मोदी सरकारने कोरोना महामारी व पेट्रोल-डिझेलच्या किमती अनलॉक केल्या आहेत" अशी टीका राहुल गांधी यांनी केली आहे. तसेच या सोबत एक ग्राफही शेअर केला आहे. यामध्ये कशी वाढ झाली हे दाखवण्यात आले आहे.
इंधन दरवाढीवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. दररोज वाढणाऱ्या पेट्रोल व डिझेलच्या किंमतींवरून जितेंद्र आव्हाड यांनी एक जुनं पोस्टर शेअर करत निशाणा साधला आहे. 2014 च्या निवडणूक प्रचाराच्या वेळी भाजपने लावलेलं एक पोस्टर आव्हाड यांनी ट्विट करून मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. बुधवारी सकाळी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून "आज पेट्रोल व डिझेल चे भाव पुन्हा वाढवले. पेट्रोल 17 पैसे ते 20 पैसे तर डिझेलच्या दरात 47 ते 55 पैसे अशी वाढ झाली आहे. महाराष्ट्रात पेट्रोलचा दर हा 86.85 रुपये तर डिझेलचा दर 77.49 रुपये" असं ट्विट आव्हाडांनी केलं आहे.
देशातील रुग्णसंख्येने आतापर्यंतचा उच्चांक गाठला आहे. गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे तब्बल 15,968 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 465 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची एकूण संख्या 4,56,183 वर पोहोचली आहे. तर कोरोनामुळे देशात 14,476 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. बुधवारी (24 जून) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासांत 15,968 नवीन कोरोनाग्रस्त आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या चार लाख 56 हजारांवर पोहोचली असून कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा 14 हजारांवर पोहोचला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
"विसरला असाल तर लक्षात आणून द्यावं म्हटलं"; 'तो' फोटो शेअर करत जितेंद्र आव्हाडांचा भाजपला टोला
धक्कादायक! तब्बल 62 एन्काउंटर करणाऱ्या माजी DSP ची आत्महत्या; सुसाईड नोटमध्ये लिहिलं...
CoronaVirus News : देशात कोरोनाचा धोका वाढला; धडकी भरवणाऱ्या आकडेवारीने पुन्हा रेकॉर्ड मोडला
CoronaVirus News : लय भारी! 'या' देशाने तयार केला 'चमत्कारिक मास्क'; कोरोनाचा करणार 99 टक्के खात्मा