नवी दिल्ली - काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना नॅशनल हेराल्ड प्रकरणी ईडी चौकशीसाठी बोलावलं असून त्यांची चौकशी सुरू आहे. मात्र या कारवाईचा निषेध करत काँग्रेसचे कार्यकर्ते देशभर रस्त्यावर उतरले आहेत. अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांनी आंदोलन केले असून त्याचा फटका वाहतूकीला बसला आहे. दिल्लीत पोलिसांकडून सकाळी ९ वाजल्यापासून गोल मेथी जंक्शन, तुगलक रोड जंक्शन, सुनहरी मस्जिद जंक्शन, मान सिंह रोड जंक्शन याठिकाणी प्रचंड बंदोबस्त तैनात केला आहे. याच दरम्यान काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.
"आज जाहीरपणे देशातील जनतेचा आवाज दाबला जातोय, अहंकार आणि हुकूमशाहीवर सत्याचा विजय होईल" असं म्हणत हल्लाबोल केला आहे. राहुल गांधी (Congress Rahul Gandhi) यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. "जीएसटीवर चर्चा करा - सभागृह तहकूब, महागाईवर चर्चा - सभागृह तहकूब, अग्निपथवर चर्चा करा - सभागृह तहकूब, एजन्सींच्या गैरवापरावर चर्चा - सभागृह तहकूब. आज जाहीरपणे देशातील जनतेचा आवाज दाबला जात आहे. या अहंकार आणि हुकूमशाहीवर 'सत्या'चा विजय होईल" असं राहुल यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी कलम ५० अंतर्गत सोनिया गांधी यांचा जबाब नोंदवला जात आहे. सोनिया गांधी यांची ईडी अधिकारी चौकशी करत आहेत. यंग इंडियन प्रायव्हेट लिमिटेडसोबत त्यांचे कनेक्शन काय याचा तपास होत आहे. या कंपनीत सोनिया गांधींनी ३८ टक्के शेअर्स खरेदी करण्याचा निर्णय का घेतला? यंग इंडियन या कंपनीचं काम काय आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरे ईडी सोनिया गांधी यांच्याकडून घेऊ शकते.
मात्र सोनिया गांधी यांच्या ईडी चौकशीला विरोध करत काँग्रेस नेते, कार्यकर्ते रस्त्यावर उतरून मोदी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर, मुख्यमंत्री अशोक गहलोत, सचिन पायलट यांच्यासह अनेक नेत्यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सोनिया गांधी यांचे वय ७० हून अधिक आहे. ईडी अधिकाऱ्यांनी त्यांच्या घरी जाऊन चौकशी करायला हवी होती. मात्र सध्या सत्तेत केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर मोठ्या प्रमाणात होत आहे असा आरोप गहलोत यांनी केला.