नवी दिल्ली - देशात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. रुग्णांच्या संख्येने तब्बल एक कोटीचा टप्पा पार केला असून दीड लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. याच दरम्यान आता काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. "केंद्र सरकारच्या अपयशी धोरणांमुळे देशात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. अहंकारी सरकारला चांगल्या सूचनांची अॅलर्जी" आहे असं म्हणत टीकास्त्र सोडलं आहे.
राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. "केंद्र सरकारच्या अपयशी धोरणांमुळे देशात कोरोनाची भयंकर अशी दुसरी लाट आहे आणि स्थलांतरित मजूर पुन्हा एकदा गावाकडे परतत आहेत. सर्वसामान्यांचं जीवन व देशाची अर्थव्यवस्था दोन्हींसाठी लसीकरण वाढवण्यासोबतच त्यांच्या हातात पैसा देणं देखील अत्यंत आवश्यक आहे. मात्र अहंकारी सरकारला चांगल्या सूचनांची अॅलर्जी आहे" असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.
कोरोना लसींची निर्यात थांबवा असं राहुल यांनी मोदींना म्हटलं आहे. "वाढत्या कोरोना संकटात लसींची कमतरता एक अतिगंभीर समस्या आहे, 'उत्सव' नाही. आपल्या देशवासियांना संकटात टाकून लसींची निर्यात योग्य आहे का? केंद्र सरकारने पक्षपातीपणा न करता सर्व राज्यांना मदत करावी. आपल्या सर्वांना मिळून या महामारीला हरवायचं आहे" असं राहुल गांधी यांनी ट्विटद्वारे म्हटलं आहे.
"आवश्यकता असलेल्या प्रत्येकाला लसीकरण झाले पाहिजे आणि तत्काळ लसींच्या निर्यातीवर बंदी आणली गेली पाहिजे. तसेच लसी जलगतीने उपलब्ध व्हायला हव्यात. देश या क्षणी महामारीच्या दुसऱ्या लाटेशी लढत आहे. आपल्या शास्त्रज्ञ व डॉक्टरांनी मिळून देशातील कोरोनाचं संकट नष्ट करण्यासाठी मोठ्या कष्टाने लस तयार केली. मात्र सरकारने लसीकरण कार्यक्रमाची योग्यप्रकारे अंमलबजावणी केली नाही. देशात एवढ्या हळूवारपणे लसीकरण सुरू आहे की, 75 टक्के लोकांना लस देण्यासाठी वर्षांचा कालावधी लागेल" असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी खबरदारीचे उपाय करण्यात येत असताना कोरोना लसीकरणाचा वेग देखील वाढवण्यात आला आहे. मात्र कोरोनावरील लस सर्व वयोगटातील नागरिकांना सध्या तरी दिली जाऊ शकत नाही असं केंद्र सरकारने स्पष्ट केलं आहे. यावरून राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. कोरोना लसीकरणावरून त्यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. "प्रत्येक भारतीयाला सुरक्षित जीवन जगण्याचा हक्क आहे" असं म्हणत त्यांनी टीकास्त्र सोडलं आहे. "गरज आणि मागणी यावर वाद घालणं हास्यास्पद आहे. प्रत्येक भारतीय नागरिकाला सुरक्षित जीवन जगण्याचा हक्क आहे" असं राहुल गांधी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.