चीनने सोमवारी आपला अधिकृत नकाशा प्रसिद्ध केला असून, यामध्ये भारताचा अरुणाचल प्रदेश, अक्साई चीन, तैवान आणि वादग्रस्त दक्षिण चीन समुद्र आपल्या हद्दीत दाखवला आहे. ‘ग्लोबल टाइम्स’ या चीनच्या अधिकृत वृत्तपत्राने एक्स सोशल मीडियावर दुपारी ३:४७ वाजता नवीन नकाशा पोस्ट केला. चीनच्या नैसर्गिक संसाधन मंत्रालयाच्या नकाशा सेवेच्या वेबसाइटवर एक नवीन नकाशादेखील लाँच करण्यात आला आहे. चीन आणि जगातील विविध देशांच्या सीमा रेखाटण्याच्या पद्धतीच्या आधारे हा नकाशा तयार करण्यात आला आहे.
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी यावर आता प्रतिक्रिया दिली आहे. "चीनने आपली जमीन हडपली हे संपूर्ण लडाखला माहितीय" असं म्हणत नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. "लडाखमध्ये एक इंचही जमीन गेली नाही, असं पंतप्रधान म्हणाले, ते खोटं आहे, हे मी अनेक वर्षांपासून म्हणत आहे. चीनने अतिक्रमण केलं आहे आणि हे संपूर्ण लडाखला माहीत आहे. नकाशाचा हा प्रश्न अतिशय गंभीर आहे. त्यांनी जमीन हिसकावून घेतली आहे. यावर पंतप्रधानांनी काही तरी बोलायला हवं" असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.
राहुल गांधी यांनी य़ाआधी देखील लडाखमध्ये मोठं विधान केलं होतं. "लडाखच्या लोकांनी मला सांगितलं आहे की, चिनी सैन्य येथे घुसलं आहे. त्यांना जी पूर्वी त्यांची ग्रेजिंग लँड होती तिथे जाता येत नाही लडाखमध्ये प्रत्येकजण हेच म्हणत आहे. एक इंचही जमीन गेली नाही असे पंतप्रधान म्हणाले आहेत, पण ते खरं नाही. तुम्ही इथे कोणालाही विचारा, तो तुम्हाला सांगेल" असं म्हणत त्यांनी मोदींवर निशाणा साधला होता.
राहुल गांधी यांनी "लडाखच्या लोकांच्या अनेक तक्रारी आहेत, त्यांना जो दर्जा देण्यात आला आहे त्यावर ते खूश नाहीत. त्यांना प्रतिनिधित्व हवे आहे आणि बेरोजगारीची समस्या आहे. नोकरशाहीने नव्हे तर जनतेच्या आवाजाने राज्य चालवले पाहिजे, असे लोक म्हणत आहेत" असं म्हटलं होतं. तसेच राहुल यांनी लडाख गाठून युवा काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांशी चर्चा केली होती. काही राजकीय लोक देशात द्वेषाचे वातावरण निर्माण करत आहेत. तुम्ही भारतात गेलात, लोकांमध्ये जा, तुम्हाला दिसेल की लोकांमध्ये एकमेकांबद्दल प्रेम आणि आदर आहे असं राहुल गांधी म्हणाले होते.