नवी दिल्ली - तपास यंत्रणांचा गैरवापर आणि केंद्र सरकारच्या विविध धोरणांविरोधात काँग्रेसने 5 ऑगस्ट रोजी देशव्यापी आंदोलन केले होते. या आंदोलनावेळी काँग्रेसच्या सर्व नेत्यांनी काळे कपडे घालून आपला विरोध दर्शवला होता. त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जोरदार टीका केली. काँग्रेसच्या आंदोलनावर बोलताना नरेंद्र मोदी म्हणाले की, 'देशातील काही लोक नकारात्मकतेच्या भोवऱ्यात अडकले आहेत, निराशेच्या गर्तेत बुडाले आहेत. सरकार विरोधात खोटं बोलत असल्यामुळे जनता जनार्दनदेखील अशा लोकांवर विश्वास ठेवायला तयार नाही. अशा नैराश्यात हे लोकही आता काळ्या जादूकडे वळताना दिसत आहेत.' यानंतर आता यावरून काँग्रेसने हल्लाबोल केला आहे.
"देशाला काळ्या जादूसारख्या अंधश्रद्धेच्या गोष्टी सांगून आपली काळी कृत्यं लपवू नका" असं म्हणत नरेंद्र मोदींवर (Narendra Modi) निशाणा साधला आहे. राहुल गांधी (Congress Rahul Gandhi) यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. "पंतप्रधान नरेंद्र मोदींना देशातील महागाई, बेराजगारी दिसत नाही का? पंतप्रधानपदाची प्रतिष्ठा खालावू नका आणि देशाला काळ्या जादूसारख्या अंधश्रद्धेच्या गोष्टी सांगून आपली काळी कृत्य लपवू नका. तुम्हाला लोकांसमोर निर्माण झालेल्या प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतील" असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.
नरेंद्र मोदींनी "या लोकांकडून काळी जादू पसरवण्याचा कसा प्रयत्न झाला, हे आपण 5 ऑगस्ट रोजी पाहिलं आहे. या लोकांना असे वाटते की काळे कपडे घातल्याने त्यांची निराशा संपेल. पण त्यांना हे माहीत नाही की, त्यांनी कितीही काळी जादू केली, अंधश्रद्धेवर विश्वास ठेवला तरी जनतेचा विश्वास त्यांच्यावर कधीच निर्माण होणार नाही" अशी जोरदार टीका केली.
मोदी पुढे म्हणतात की, 'देशाच्या अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर देश तिरंग्याच्या रंगात रंगला आहे. पण, या पवित्र सोहळ्याला बदनाम करण्याचा, आपल्या शूर स्वातंत्र्यसैनिकांचा अपमान करण्याचा प्रयत्न केला जातोय. अशा लोकांची मानसिकता समजून घेणे गरजेचे आहे.' यावेळी मोदींनी आम आदमी पार्टीचे नाव न घेता निशाणा साधला. 'स्वार्थ असेल तर कोणीही पेट्रोल-डिझेल मोफत देण्याची घोषणा करू शकते. अशी पावले आपल्या मुलांकडून त्यांचे हक्क हिरावून घेतील, देशाला स्वावलंबी होण्यापासून रोखतील. अशा स्वार्थी धोरणांमुळे देशातील प्रामाणिक करदात्याचा भारही वाढणार आहे,' असा घणाघात त्यांनी केला.