नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या 'मन की बात'च्या माध्यमातून देशवासियांना संबोधित केलं. 'कोरोना काळात देशातील नागरिकांना आपल्या जबाबदारीची पूर्ण जाणीव आहे. देशात आयोजित होणाऱ्या प्रत्येक उत्सवात ज्या पद्धतीने संयम आणि साधेपणा दिसत आहे. हे अभूतपूर्व आहे' असं म्हणत मोदींनी लोकल खेळण्यांसाठी व्होकल व्हा असं आवाहनही जनतेला केलं आहे. मात्र यावेळी पंतप्रधानांनी परीक्षांच्या संदर्भात काहीच भाष्य केले नाही. यावरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.
पंतप्रधानांच्या 'मन की बात'वर राहुल गांधी यांनी हल्लाबोल केला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून रविवारी (30 ऑगस्ट) आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. "पंतप्रधानांनी परीक्षेवर चर्चा करावी असं जेईई-नीटच्या परीक्षार्थींना वाटत होतं. मात्र, पंतप्रधानांनी 'खेळण्यांवर चर्चा' केली" असं म्हटलं आहे. यासोबतच Mann_Ki_Nahi_Students_Ki_Baat हा हॅशटॅग देखील वापरला आहे.
राहुल गांधी कोरोना, लॉकडाऊन यासह विविध मुद्द्यांवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मोदी सरकारवर निशाणा साधत आहेत. याआधीही अनेकदा त्यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. काही दिवसांपूर्वी 'येत्या 6-7 महिन्यांत हा देश तरुणांना रोजगार देऊ शकणार नाही' असं म्हटलं होतं. 'देश तरुणांना रोजगार देऊ शकणार नाही. जेव्हा मी देशाला कोरोनामुळे मोठं नुकसान सोसावं लागेल असा इशारा दिला तेव्हा मीडियाने माझी खिल्ली उडवली. आजही मी सांगू इच्छितो की येत्या काळात देश तरुणांना रोजगार देऊ शकणार नाही. तुम्ही याच्याशी संमत नसाल तर केवळ सहा-सात महिन्यांची वाट पाहा' असं राहुल गांधी यांनी म्हटलं होतं.
राहुल गांधी यांनी याआधी "4 महिन्यांत गेल्या 2 कोटी लोकांच्या नोकऱ्या, 2 कोटी कुटुंबांचं भविष्य अंधारात" असल्याचं म्हटलं आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून त्यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. "गेल्या 4 महिन्यांत जवळपास 2 कोटी लोकांच्या नोकऱ्या गेल्या, 2 कोटी कुटुंबांचं भविष्य अंधारात आहे. फेसबुकवर खोट्या बातम्या आणि द्वेष पसरवून बेरोजगारी आणि अर्थव्यवस्थेच्या सर्वनाशाचे सत्य देशापासून लपवता येत नाही" असं राहुल गांधी यांनी म्हटलं होतं.
महत्त्वाच्या बातम्या
"चाकरमान्यांना यावर्षी एवढे का छळताय?, कोकणी माणसाच्या सहनशीलतेला का नख लावताय?"
बापरे! 17 वर्षांपासून तरुणाच्या डोक्यात होता 5 इंचाचा किडा, डॉक्टरांनाही बसला धक्का
काय सांगता? तब्बल 28 वर्षांनी मिळालं चोरीला गेलेलं मंगळसूत्र
माता न तू वैरिणी! पतीने माहेरी जाऊ दिलं नाही, पत्नीने 2 मुलींची केली हत्या