नवी दिल्ली - देशात कोरोनाने थैमान घातले आहे. देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येने एक कोटीचा टप्पा ओलांडला आहे. गेल्या २४ तासांत देशभरामध्ये २५ हजार १५३ नवे रुग्ण सापडले असून, त्यामुळे देशातील आतापर्यंतच्या कोरोनाबाधितांची संख्या ही १ कोटी चार हजार ५९९ एवढी झाली आहे. एक कोटी कोरोनाबाधित रुग्ण असलेला भारत हा अमेरिकेनंतरचा दुसरा देश ठरला आहे. देशातील कोरोनाग्रस्तांच्या वाढत्या संख्येवरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. "देशातील कोट्यवधी लोकांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं" असं म्हणत राहुल यांनी निशाणा साधला आहे. "देशातील कोरोना रुग्णांची संख्या १ कोटीवर तर जवळपास दीड लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. पंतप्रधानांनी २१ दिवसांत कोरोनाविरोधातील लढाई जिंकण्याचा दावा केला होता. मात्र, अनियोजित लॉकडाऊनमधून ते साध्य झालं नाही. पण, देशातील कोट्यवधी लोकांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं" असं राहुल गांधी यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
गेल्या २४ तासांत देशामध्ये २५ हजार १५३ नवे रुग्ण
दिलासादायक बाब म्हणजे गेल्या तीन महिन्यांपासून देशातील कोरोनाबाधितांची संख्या सातत्याने कमी होत असून, सध्या देशात केवळ ३ लाख ८ हजार ७५१ अॅक्टिव्ह रुग्ण उरले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार गेल्या २४ तासांत देशामध्ये २५ हजार १५३ रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाबाधितांची संख्या ही १ कोटी चार हजार ५९९ वर पोहोचली आहे. एकूण रुग्णांपैकी ९५ लाख ५० हजार ७१२ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर १ लाख ४५ हजार १३६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या देशातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ३ लाख आठ हजार ७५१ एवढी आहे.
देशात तीन लाखांहून अधिक अॅक्टिव्ह रुग्ण
गेल्या काही आठवड्यांपासून देशातील कोरोनाच्या संसर्गाचा पॉझिटिव्हिटी रेट सातत्याने घसरत आहे. मात्र सद्यस्थितीत देशात तीन लाखांहून अधिक अॅक्टिव्ह रुग्ण आहे. मात्र नव्याने सापडणाऱ्या रुग्णांपेक्षा बऱ्या होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. भारतात कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण ९५ टक्क्यांहून अधिक झाले आहे. त्यामुळे भारताचा समावेश कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांचे प्रमाण अधिक असलेल्या देशांमध्ये झाला आहे. सध्या दररोज नव्या रुग्णांपेक्षा बऱ्या झालेल्या रुग्णांचे प्रमाण सातत्याने वाढत आहे.