नवी दिल्ली - उत्तर प्रदेशच्या हाथरसमधील 19 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार झाला होता. दिल्लीत सफदरजंग रुग्णालयामध्ये उपचार सुरू असताना मंगळवारी पीडितेचा मृत्यू झाला. यामुळे देशभर संताप व्यक्त होत आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी हाथरस प्रकरणावरून पुन्हा एकदा योगी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. "सत्य लपवण्यासाठी उत्तर प्रदेश प्रशासन अमानवीय प्रकार करतंय" असं म्हणत राहुल यांनी टीका केली आहे. तसेच यासोबत एक व्हिडीओही ट्विट केला आहे.
राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून वृत्तवाहिन्यांशी बोलणाऱ्या पीडितेच्या नातेवाईकांचा एक व्हिडीओ ट्विट केला आहे. तसेच "उत्तर प्रदेश प्रशासन सत्य लपवण्यासाठी अमानवीय प्रकार करतंय. ना आम्हाला, ना माध्यमांना पीडितेच्या कुटुंबीयांशी भेटू दिलं. त्याचबरोबर त्यांनाही बाहेर येऊ दिलं जात नाही. पीडितेच्या कुटुंबीयांना मारहाण आणि त्यांच्यासोबत असभ्य वर्तन केलं जात आहे. कोणताही भारतीय अशा वागणुकीचं समर्थन करू शकत नाही" असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.
"मी अन्यायासमोर झुकणार नाही, असत्यावर सत्याने विजय मिळवेन"
राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक ट्विट केलं आहे. यामध्ये त्यांनी "मैं दुनिया में किसी से नहीं डरूंगा" असं म्हटलं आहे. गांधी जयंतीच्या निमित्ताने राहुल यांनी हे ट्विट केलं आहे. "मी जगातील कोणालाही घाबरणार नाही. मी कोणत्याही अन्यायासमोर झुकणार नाही. मी असत्यावर सत्याने विजय मिळवेन आणि असत्याचा विरोध करताना सर्व कष्ट सहन करू शकेन. गांधी जयंतीच्या शुभेच्छा" असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.
"मैं दुनिया में किसी से नहीं डरूंगा", राहुल-प्रियंका गांधींसह 200 जणांवर FIR दाखल
राहुल आणि प्रियंका गांधींसह तब्बल 200 जणांविरोधात FIR दाखल करण्यात आली आहे. कलम 144 चं उल्लंघन केल्याप्रकरणी आणि कोरोनाच्या संकट काळात सर्वसामान्यांचा जीव धोक्यात आणल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहुल गांधी आणि प्रियंका गांधींसह काँग्रेसचे कार्यकर्ते आणि नेत्यांविरोधात कलम 188, 269, 270 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या आधी काँग्रेसच्या नेत्यांना हाथरस येथे पीडितेच्या कुटुंबियांची भेट घेण्यापासून रोखण्यात आलं होतं. यामुळे काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.