काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शनिवारी अपोलो रुग्णालयाजवळ रुग्णवाहिकेला रस्ता देण्यासाठी त्यांची 'भारत जोडो यात्रा' काही काळासाठी थांबवली. रुग्णवाहिका जाऊ देण्यासाठी राहुल गांधी हे काही वेळ रस्त्यावरच थांबले. त्यांनी सहकाऱ्यांनाही सर्वप्रथम रुग्णवाहिकेला रस्ता देण्यास सांगितले. मिळालेल्या माहितीनुसार, राजधानीतील अपोलो रुग्णालयाजवळ सकाळी 8.30 वाजता ही घटना घडली आहे.
राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली 'भारत जोडो यात्रा' सकाळी हरियाणाच्या बदरपूर सीमेवरून दिल्लीत दाखल झाली. ही यात्रा दिल्लीतील बदरपूर सीमेपासून 23 किलोमीटरचे अंतर कापून लाल किल्ल्याजवळ संपेल. याच दरम्यान ती आश्रम चौक, निजामुद्दीन, इंडिया गेट, आयटीओ, लाल किल्ला, राजघाट या मार्गे जाईल. लाल किल्ल्याकडे जाण्यापूर्वी यात्रेने आश्रम चौकात दोन तासांची विश्रांती घेतली आहे.
'भारत जोडो यात्रे'ने यापूर्वीच सुमारे 3,000 किलोमीटरचे अंतर कापले आहे. जानेवारीच्या अखेरीस जम्मू आणि काश्मीरमध्ये समाप्त होण्यापूर्वी ती 12 राज्यांमध्ये एकूण 3,570 किमीचा प्रवास करेल. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. भारत जोडो यात्रा थांबवण्यासाठी कोरोनाचा वापर केला जात असल्याचा आरोप राहुल यांनी केला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी पत्र लिहून राहुल गांधींना भारत जोडो यात्रा पुढे ढकलण्याची विनंती केली होती.
"मास्क लावा, कोरोना येतोय... हा भारत जोडो यात्रा रोखण्यासाठीचा बहाणा"
हरियाणातील नूह येथे राहुल गांधी म्हणाले की, त्यांची यात्रा रोखण्यासाठी कट रचला जात आहे. यामुळे भाजपाचे लोक घाबरले आहेत. यापूर्वी अनेक काँग्रेस नेत्यांनी सांगितले होते की, भारत जोडो यात्रा थांबवण्यासाठी कोरोनाची भीती दाखवली जात आहे. नूह येथे भारत जोडो यात्रेदरम्यान लोकांना संबोधित करताना राहुल गांधी म्हणाले, "त्यांनी एक नवीन कल्पना शोधून काढली आहे. मला पत्र लिहिले की, कोरोना येत आहे, यात्रा थांबवा. आता भाऊ, तुम्ही बघा, भारत जोडो यात्रा थांबवण्याचे बहाणे दिले जात आहेत. कोरोना पसरत आहे, प्रवास थांबवा मास्क घाला. हे सर्व बहाणे आहेत. हे लोक भारताच्या शक्तीला आणि सत्याला घाबरतात."
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"