नवी दिल्ली - काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) सध्या केरळ दौऱ्यावर आहेत. केरळच्या मलप्पूरममध्ये राहुल यांनी जनतेला संबोधित करताना पुन्हा एकदा मोदी सरकारवर (Modi Government) जोरदार हल्लाबोल केला आहे. न्यायव्यवस्थेवरही मोदी सरकारचे नियंत्रण असल्याची घणाघाती टीका केली आहे. न्यायव्यवस्थेच्या मुद्द्यावरून राहुल यांनी मोदी सरकारवर गंभीर आरोप केला आहे. "केंद्र सरकार स्वतःच्या इच्छा आणि ताकद न्यायपालिकेवर लादत असून न्यायालयांनी जे करणं आवश्यक आहे, ते सरकारकडून करू दिलं जात नाही. न्यायव्यवस्थेवर मोदी सरकारचे नियंत्रण आहे" अशी घणाघाती टीका राहुल गांधी यांनी केली आहे.
"दिल्लीतील सरकार (मोदी सरकार) स्वतःच्या इच्छा आणि ताकद न्यायव्यवस्थेवर लादत आहे. केंद्र सरकार काही गोष्टी होऊ देत नाहीत किंवा जे करणं आवश्यक आहे, ते न्यायपालिकेला करू देत नाही. हे फक्त न्यायालयांच्या बाबतीतच नाही, तर ते लोकसभा आणि राज्यसभेतही चर्चा करू देत नाही. निवडणूक जिंकणं म्हणजे हरणं आणि हरणं म्हणजे जिंकणं असं पहिल्यादांच घडत आहे" अशा शब्दांत राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून राहुल गांधी मोदींवर विविध मुद्द्यांवरून टीकास्त्र सोडत आहेत.
"तुमचा खिसा रिकामा करून मित्रांना देण्याचं महान काम मोदी सरकार मोफत करतंय", राहुल गांधींचा हल्लाबोल
पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि मोदी सरकारवर (Modi Government) निशाणा साधला आहे. इंधन दरवाढीवरून हल्लाबोल केला आहे. "तुमचा खिसा रिकामा करून मित्रांना देण्याचं महान काम मोदी सरकार मोफत करतंय" असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. तसेच कच्च्या तेलाच्या किंमती वाढलेल्या नाहीत, तर उलट घसरल्या आहेत असं देखील म्हणत मोदी सरकारला सणसणीत टोला लगावला आहे. राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. "पेट्रोल पंपावर गाडीत तेल भरताना जेव्हा तुमची नजर वेगाने धावणाऱ्या मीटरकडे जाईल, तेव्हा हे लक्षात घ्या की, कच्च्या तेलाचे दर वाढलेले नाहीत, तर उलट कमी झाले आहेत. पेट्रोल 100 रुपये प्रति लीटर आहे. तुमचा खिसा रिकामा करून मित्रांना देण्याचं महान काम मोदी सरकार मोफत करत आहे" असं राहुल यांनी म्हटलं आहे.
"वो जुमलों का शोर मचाते हैं, हम..."; इंधन दरवाढीवरून राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
राहुल गांधी यांनी याआधीही ट्वीटरवरून जोरदार टीका केली होती. "वो जुमलों का शोर मचाते हैं, हम सच का आईना दिखाते हैं।" असं म्हणत राहुल यांनी मोदी सरकारवर घणाघात केला होता. तसेच "जून 2014 मध्ये भाजपाचं सरकार आलं, तेव्हा कच्च्या तेलाच्या किंमती 93 डॉलर प्रतिबॅरल होत्या. तेव्हा पेट्रोल 71 तर डिझेल 57 रुपये प्रतिलिटर होतं. गेल्या 7 वर्षांत कच्चं तेल 30 डॉलरने स्वस्त झालं. पण तरीही पेट्रोल सेंच्युरी करत आहे आणि डिझेल त्याच्या पाठोपाठ जात आहे" असं राहुल गांधी यांनी म्हटलं होतं. "2021 मध्ये 19 वेळा ही दरवाढ झाली आहे. म्हणजेच 45 दिवसांत 19 वेळा किंमत वाढली आहे. 15 फेब्रुवारी 2020 ते 15 फेब्रुवारी 2021 या काळात पेट्रोल 17.05 तर डिझेल 14.58 रुपयांनी महाग झालं आहे" हे सांगणारी आकडेवारी राहुल गांधी यांनी सादर केली होती.