New Parliament Inauguration: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नव्या संसद भवनाचे उद्घाटन करण्यात आले. सर्वधर्मीय प्रार्थना करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी नवीन संसदेत प्रवेश करण्यापूर्वी विधीवत पूजन-हवन केले. तामिळनाडूतील अध्यानम संतांनी वैदिक मंत्रोच्चार केला. लोकसभा सभागृहात बसवल्या जाणाऱ्या सेंगोलचे पूजन केले. १९ पक्षांनी या उद्घाटन सोहळ्यावर बहिष्कार घातला होता. यानंतर आता काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्विट करत यावर प्रतिक्रिया दिली आहे.
नवीन संसद भवनाच्या लोकार्पणानंतर विरोधकांकडून यावर टीका केली जात आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी यांसह अनेक विरोधी पक्षांनी यावर खोचक शब्दांत प्रतिक्रिया दिली. कार्यक्रम पाहिला. पण मला आनंद आहे की तिथे गेलो नाही. तिथे जे काही घडले ते पाहून मला काळजी वाटली. आपण देशाला मागे नेत आहोत का? हा कार्यक्रम फक्त मर्यादित लोकांसाठीच होता का? अशी विचारणा करत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी यावर तिरकस भाष्य केले. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्विट करत केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला.
संसद लोकांचा आवाज आहे
राहुल गांधी यांनी दोन वाक्यांचे ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये राहुल गांधी म्हणतात की, संसद लोकांचा आवाज आहे. पंतप्रधान संसद भवनाच्या उद्घाटनाला राज्याभिषेक समजत आहेत, असा खोचक टोला राहुल गांधी यांनी लगावला आहे. राहुल गांधी यांनी सुरुवातीपासूनच या उद्घाटन कार्यक्रमाला विरोध दर्शवला होता. तसेच, अनेकांना आमंत्रण देण्यात आले नसल्याचा दावाही विरोधी पक्षातील खासदारांनी केला आहे. त्यामुळे यावरून देशातील राजकारण तापले आहे.
दरम्यान, संसदेचा इव्हेंट करू नका, ते लोकशाहीतील आमचे मंदिर आहे. ही लोकशाही आहे, दडपशाही नाही. लोकशाहीमध्ये विरोधक आणि सत्तेतले असे दोन्ही लोक असले पाहिजेत आणि सर्वांचा समन्वय साधूनच देश चालतो, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली.