महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. तीन तरुणांकडून हा गोळीबार करण्यात आला. बाबा सिद्दिकी हे त्यांचे पुत्र आणि आमदार झिशान सिद्दिकी यांच्या वांद्रे पूर्व परिसरातील खेरनगर येथील कार्यालयाजवळ थांबले होते.
अज्ञात व्यक्तींनी यावेळी सिद्दिकी यांच्यावर गोळीबार केला. गोळीबारात गंभीर जखमी झालेल्या सिद्दिकी यांना तातडीने लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु त्यांचा मृत्यू झाला. याच दरम्यान काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी बाबा सिद्दिकींची गोळ्या घालून हत्या केल्याच्या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. "महाराष्ट्रातील कायदा, सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडली, सरकारने जबाबदारी स्वीकारली पाहिजे" असं म्हटलं आहे.
राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "बाबा सिद्दीकीजी यांचं निधन धक्कादायक आणि दुःखदायक आहे. या कठीण काळात माझ्या संवेदना त्यांच्या कुटुंबासोबत आहेत. या भीषण घटनेने महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडली असल्याचं दिसून येत आहे. सरकारने याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे आणि न्याय मिळाला पाहिजे" असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.
"राज्यातील कायदा सुव्यवस्थेची दुर्दशा..."; बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर सुप्रिया सुळेंची पोस्ट
बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर सुप्रिया सुळे यांनी पोस्ट केली आहे. "अतिशय धक्कादायक! पुणे असो किंवा मुंबई राज्यातील कायदा सुव्यवस्थेची दुर्दशा दाखविणारी ही आणखी एक घटना. गोळीबार करणाऱ्या गुन्हेगारांवर कठोरात कठोर कारवाई करावी" असं म्हटलं आहे. सुप्रिया सुळे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे.