नवी दिल्ली - काँग्रेस नेते राहुल गांधी (Congress Rahul Gandhi ) यांनी शेतकरी आंदोलनावरून केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. यानंतर आता भाजपाने (BJP) यावर पलटवार केला आहे. राहुल गांधींनी 'तो ठाम आहे, तो निर्भय आहे, इथेच आहे... भारताचा भाग्यविधाता!' असं ट्वीट केलं. पण या ट्वीटमध्ये त्यांनी एक चूक केली. त्यांनी आंदोलन करणाऱ्या ज्या शेतकऱ्यांचा फोटो शेअर केला तो फेब्रुवारीतला आहे. त्यामुळे भाजपाने यावरून राहुल गांधींवर जोरदार निशाणा साधला आहे. 'राहुल गांधी हे सध्याच्या भारतीय राजकारणातील 'राजकीय कुक्कू (कोकीळ)' अशी बोचरी टीका केली आहे. तसेच कोकीळ हा पक्ष कधीच आपलं घरटं बांधत नाही. तो कष्ट घेत नाही. हा दुसऱ्या पक्षांच्या घरट्यातून आनंद घेतो. राहुल गांधी सध्या असंच करत आहेत', अशा शब्दांत टीकास्त्र सोडलं आहे.
भाजपा प्रवक्ते संबित पात्रा यांनी पत्रकार परिषद घेत या प्रकरणावरून राहुल गांधींवर टीका केली आहे. राहुल गांधी जमिनीवरून राजकारण करत नाही. पण ट्विटरवर सक्रिय असल्याने ते भ्रमाचं राजकारण करत आहेत. त्यांनी ट्वीट करून मुजफ्फरनगरमधील शेतकरी आंदोलनाचा खोटा फोटो दाखवला, असं संबित पात्रा म्हणाले. "राहुल गांधी हे भारतीय राजकारणातील राजकीय कुक्कू आहेत. जो दुसऱ्यांच्या घरट्यावर अवलंबून असतो. असंच राहुल गांधींचही आहे. आपल्या पक्षाला पुढे न नेणं, अध्यक्षाविना आपला पक्ष चालवणं, कठोर परिश्रम न करणं आणि दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून चालवण्याचा प्रयत्न करणं ही राहुल गांधींना वाईट सवय जडली आहे" असं म्हटलं आहे.
"देशात जेव्हाही भ्रम आणि खोटारडेपणाचं राजकारण होतं, त्यामागे राहुल गांधींचाच असतो हात"
देशात जेव्हाही भ्रम आणि खोटारडेपणाचं राजकारण होतं, त्यामागे राहुल गांधींचा हात असतो, अशी टीका संबित पात्रा यांनी केली आहे. काही दिवसांपूर्वी राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला होता. तेलाच्या किमतीत वाढ झाल्याची थेट झळ देशातील सर्वसामान्य नागरिकाला बसते. जनतेच्या खिशावर याचा परिणाम होतो. प्रवास खर्च वाढल्यानं महागाई वाढते, पण याचा मोदी सरकारला काहीच फरक पडत नाही, असं राहुल म्हणाले. "पंतप्रधान मोदी वारंवार सांगतायत GDP वाढतोय. अर्थमंत्रीही म्हणतायत GDP वाढतोय. ते नेमकं कोणत्या GDP बाबत बोलत आहेत ते मला नंतर कळलं. 'Gas-Deisel-Petrol' असा त्याचा अर्थ आहे. त्यांनी जीडीपीबाबत गोंधळ निर्माण केलाय", असा खोचक टोला राहुल यांनी यावेळी लगावला. यानंतर भाजपाने त्याला देखील प्रत्युत्तर दिलं होतं.
"G से गांधी, D से..."; भाजपा नेत्याने राहुल गांधींना सांगितला GDP चा नवा अर्थ, म्हणाले...
मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा (BJP Narottam Mishra) यांनी राहुल गांधी (Congress Rahul Gandhi) यांना प्रत्युत्तर दिलं होतं. "राहुल गांधींना जीडीपीच्या अर्थ काय कळणार?" असा सवाल करत त्यांनी जीडीपीचा नवा अर्थ सांगितला. मिश्रा यांनी "राहुल गांधींसाठी जी म्हणजे गांधी (सोनिया गांधी, प्रियंका गांधी, राहुल गांधी), डी म्हणजे त्यांचे राजकीय गुरू दिग्विजय सिंह, पी म्हणजे पी. चिदंबरम. मग राहुल गांधींना जीडीपीचा अर्थ काय कळणार?" असा टोला राहुल गांधींवर टीका करताना लगावला होता.