मानसा: अलीकडेच प्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला (Sidhu Moose Wala) यांची अज्ञात हल्लेखोरांकडून गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. यानंतर देशभरात यावरून प्रतिक्रिया उमटल्या. या प्रकरणी पोलिसांनी तत्काळ कारवाई करत काही संशयितांना अटकही केली. मुसेवाला हत्याकांडाचे पुणे कनेक्शनही समोर आले आहे. यातच आता काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी पंजाबमधील मानसा येथे जाऊन सिद्धू मुसेवाला यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली.
राहुल गांधी यांनी स्वतः ट्विट करून यासंदर्भात माहिती दिली असून, पंजाबमधील आप सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. अलीकडेच झालेल्या पंजाब विधानसभा निवडणुकीत सिद्धू मूसवाला यांनी काँग्रेसच्या तिकिटावर मानसा गावातून निवडणूक लढवली होती. याआधीही राजस्थानचे नेते सचिन पायलट यांच्यासह अनेक नेत्यांनी गायकाच्या कुटुंबीयांची भेट घेतली. ही घटना घडली तेव्हा राहुल गांधी परदेशात होते आणि गेल्या आठवड्यात ते मायदेशी परतले आहेत.
आप सरकार पंजाबमध्ये शांतता राखण्यात अपयशी ठरले आहे
या भेटीनंतर राहुल गांधी यांनी ट्विट करत पंजाबमधील आप सरकारवर सडकून टीका केली आहे. काँग्रेस नेते सिद्धू मुसेवाला यांच्या आई-वडिलांना ज्या दु:खाचा सामना करावा लागत आहे, ते शब्दात सांगणे कठीण आहे. त्यांना न्याय देणे आमचे कर्तव्य आहे आणि आम्ही पार पाडू. राज्यातील कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. आप सरकार पंजाबमध्ये शांतता राखण्यात अपयशी ठरले आहे, या शब्दांत राहुल गांधी यांनी आप सरकारवर हल्लाबोल केला आहे. पंजाबमधील मानसा गावात पोहोचलेल्या राहुल गांधींनी मुसेवाला यांच्या कुटुंबियांशी चर्चा केली. सुमारे ४५ मिनिटे ते सिद्धू कुटुंबासोबत होते. यावेळी त्यांच्यासोबत पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष अमरिंदर सिंग राजा वाडिंग, प्रताप सिंग बाजवा आणि माजी उपमुख्यमंत्री अंबिका सोनी उपस्थित होते.
दरम्यान, सिद्धू मुसेवालाच्या कुटुंबियांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. तत्पूर्वी पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनीही त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेत शोक व्यक्त केला होता. काँग्रेसच्या शिष्टमंडळाने पंजाबचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांची भेट घेतली होती. त्यावेळी मुसेवाला हत्याकांडाचा तपास सीबीआय किंवा एनआयए मार्फत करण्याची मागणी करण्यात आली होती.