नवी दिल्ली - बहुप्रतीक्षित काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी आज अधिसूचना जारी करण्यात येणार आहे. राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्षपद स्वीकारण्यास नकार दिल्याने आता काँग्रेसच्या अध्यक्षपदी कोण विराजमान होणार याबाबतची उत्सुकता राजकीय वर्तुळात निर्माण झाली आहे. दरम्यान, आता काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत आणि केरळमधील खासदार डॉ. शशी थरूर यांच्याल लढत रंगण्याची शक्यता आहे. दोन्ही नेत्यांनी काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत उतरण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. त्यामुळे २२ वर्षांनंतर काँग्रेसचा अध्यक्ष हा निवडणुकीच्या माध्यमातून निवडला जाण्याची शक्यता वाढली आहे.
राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी आपण पक्षाचा आदेश मानणार असल्याचे सांगितले. मात्र त्याआधी राहुल गांधींना अध्यक्ष बनण्यासाठी त्यांची मनधरणी करण्याचा शेवटचा प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. दुसरीकडे काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याचे आधीपासूनच संकेत देणाऱ्या शशी थरूर यांनी काँग्रेसच्या मुख्यालयात येऊन निवडणूक प्रक्रियेबाबत माहिती घेतली आहे. दरम्यान, या निवडणुकीत काँग्रेसचे इतरही काही नेते उतरण्याची शक्यता नाकारता येत नाही.
दरम्यान, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी काँग्रेसचे अध्यक्षपद मिळाल्यास हे पद आणि राजस्थानचे मुख्यमंत्रिपद अशी दोन्ही पदे एकत्रितपणे सांभाळण्याचे संकेत दिले आहेत. मात्र अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारताना मुख्यमंत्रिपद सोडावे लागल्यास या पदाची जबाबदारी ते कुणाकडे सोपवतील, याबाबतची स्पष्टता होऊ शकलेली नाही.
दरम्यान, अशोक गहलोत आज केरळमध्ये पोहोचणार आहेत. तिथे ते राहुल गांधी यांची भेट घेऊन चर्चा करणार आहेत. ते काँग्रेसचे अध्यक्षपद स्वीकारण्यासाठी राहुल गांधी यांना विनंती करणार आहेत. दरम्यान, पक्षाचा जो निर्णय असेल तो मी मान्य करेन, असे सांगत त्यांनी काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.
दरम्यान, शशी थरूर यांनी काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याच्या दिलेल्या संकेताबाबत विचारले असता अशोक गहलोत यांनी सांगितले की, लढत झाली पाहिजे. त्यामुळे पक्षात अंतर्गत लोकशाही आहे हे लोकांना कळेल. ही बाब अंतर्गत लोकशाहीसाठी चांगली गोष्ट आहे. भाजपामध्ये राजनाथ सिंह आणि जेपी नड्डा हे कसे अध्यक्ष बनले हे कळते का? असा टोलाही त्यांनी लगावला.