ग्वाल्हेरच्या शिंदेंच्या पूर्वजांवर काँग्रेसने उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, मिळालं जोरदार प्रत्युत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2023 01:38 PM2023-02-11T13:38:36+5:302023-02-11T13:39:07+5:30
Jyotiraditya Scindia : काँग्रेसच्या महिला नेत्या आणि प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांनी ज्योतिरादित्य शिंदेंच्या पूर्वजांवर प्रश्चनिन्ह उपस्थित केलं.त्यानंतर ज्योतिरादित्य शिंदे यांनीही त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले.
ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यापासून पक्षाकडून त्यांच्यावर घणाघाती टीका केली जात आहे. दरम्यान, काँग्रेसच्या महिला नेत्या आणि प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांनी ज्योतिरादित्य शिंदेंच्या पूर्वजांवर प्रश्चनिन्ह उपस्थित केलं आहे. एका पोस्टवरून सुप्रिया श्रीनेत यांनी शिंदेंना घेरण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर ज्योतिरादित्य शिंदे यांनीही त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले. त्यांनी सुप्रिया श्रीनेत यांना कविता कमी वाचण्याचा आणि इतिहासाचं वाचन अधिक करण्याचा सल्ला दिला.
१० फेब्रुवारी रोजी केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी ट्विट केले की, आजच्याच दिवशी १७७१ मध्ये दिल्ली जिंकून भारताच्या अखंडतेसाठी माझे पूर्वज आणि प्रेरणास्रोत द ग्रेट मराठा पाटिलबुवा महादजी शिंदे यांना इतिहासामध्ये दुरदर्शी राजकारणी म्हणून सन्मान दिला गेला. त्यांचे महान शौर्य आणि बलिदानाला कोटी कोटी नमन.
ज्योतिरादित्य शिंदे यांच्या ट्विटवर सुप्रिया श्रीनेत यांनीही ट्विट केलं आहे, त्यात त्या म्हणाल्या की, म्हटलं विचारूया १८५७ च्या क्रांतीमध्ये तुमचे पूर्वज कुठे होते. त्याला उत्तर देताना ज्योतिरादित्य शिंदे यांनी पुन्हा ट्विट केले आहे. सुप्रिया श्रीनेत यांनी कविता कमी आणि इतिहास अधिक वाचावा. शिंदे कुटुंबीयांच्या पूर्वजांच्या योगदानाबाबत १८५७ च्या युद्धातील महान क्रांतिकारक तात्या टोपे यांचे वंशज पराग टोपे यांनी आपल्या पुस्तकात विस्ताराने लिहिले आहे. एकदा वाचण्याचं कष्ट घ्या, असा टोला लगावला आहे.
गेल्या काही काळापासून काँग्रेसकडून केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदेंवर सातत्याने हल्ला केला जात आहे. काही दिवसांपूर्वी मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी सांगितले की, आता आम्हाला कुठल्याही शिंदेंची गरज नाही. ते काही तोफ नाही आहेत. जर तोफ असते तर ग्वाल्हेर आणि मुरैना येथील महापौर पदाची निवडणूक का हरले.